सराईत मन्ना चांदोरीहून पळाला आणि घडला एक थरार. वाचा पुढे

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. १ : काल ३१ जुलै रोजी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गणेश बबनराव धुमाळ ( ३६, रा. लिबर्टी सोसायटी, आनंदवल्ली बस स्टॉप, नाशिक) याला चांदोरीहून सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले.

महिंद्रा लोगान गाडीतून त्याला ताब्यात घेतले, त्याच वेळेस त्याचा साथीदार मनोज उर्फ मन्ना लक्ष्मण वझरे, रा गंगापूर रोड हा जवळच्या महिंद्रा लोगॉन कारने फरार झाला.

आणि इथूनच सुरू झाला त्याला पकडण्याचा थरारक पाठलाग.

चांदोरी चौफुलीवरून पळाल्यानंतर संशयित मनोज वझरेने थेट औरंगाबाद हायवे पकडून नाशिकच्या दिशेने भरधाव गाडी सोडली.

पोलिस त्याच्या मागावर होतेच, पण त्याने लाखलगावला डावीकडे वळण घेऊन सामनगावमार्गे  पुणे हायवेकडे पलायन केले.

दरम्यान वायरलेसहून ग्रामीण पोलिसांनी संदेश दिला आणि सिन्नर फाटा येथे नाकेबंदी केली. पण मन्नाने तेथूनही पोलिसांना गुंगारा दिला.

त्यामुळे पोलिसांने सर्व नाकेबंदीपथकांना संदेश देऊन सदर गाडी पकडण्यास सांगितले.

त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती. त्यांना थोड्याच अवधीत खबऱ्यामार्फत संबंधित कार ही वाशिंद परिसरात असल्याचे समजले.

त्यानंतर जराही वेळ न दवडता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि इगतपुरी पोलिसांचे कर्मचाऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील वाशिंद परिसरात कसून शोध घेतला.

अखेर त्यांना वाशिंद गावाजवळ फुडमॅक्स नावाच्या हॉटेलबाहेरील पार्कींगमध्ये सदर वाहन क्र. एम. एच १५, ई ७३४८ मिळून आले. हे ते वाहन ज्याच्यासाठी नाशिक पोलिसांनी थरारक पाठलाग केला होता.

वाहनातच मनोज उर्फ मन्ना लक्ष्मण वझरे (वय. ४०, इंद्रनील सोसायटी,  निर्मला कॉन्व्हेंट स्कूलजवळ, नाशिक) सापडला. त्याला वाहनासह ताब्यात घेतले आणि एक थरारक पाठलाग संपला.

वझरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म ॲक्टप्रमाणे ३  गुन्हे दाखल आहेत. तसेच खून, जबर दुखापत व खंडणीचेही गुन्हे दाखल आहेत. या दोघांवरही सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधिक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरूद्ध व्यापक कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून पुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे.

या दोघा सराईतांना चिकाटीने ताब्यात घेतल्याबद्दल ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

*