Video : रिक्षाचालकांची कागदपत्रे कचऱ्यात; आडगाव नाक्याला जोरदार आंदोलन

0

पंचवटी (प्रतिनिधी) ता. ६ : वाहतुक पोलिसांच्या कार्यप्रणालीला कंटाळून संतप्त झालेल्या शेकडो रिक्षाचालकांनी आज सकाळी आडगाव नाका येथे आंदोलन केले.

यावेळी रिक्षाचालकांनी इतर प्रवासी रिक्षा थांबवून त्यातील प्रवाशांना उतरवून त्या रिक्षाचालकांनाही आंदोलनात सहभागी करून घेतले.

येथील नव्यानेच सुरू झालेल्या वाहतुक पोलिस कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांना जाणूनबुजून त्रास देणे, त्यांची कागदपत्रे कचऱ्यात टाकून, ती नाही असे सांगत त्यांच्याकडून दंड वसूल करणे यासारखे प्रकार होत आहेत, असा आरोप रिक्षा चालकांचा आहे.

आज सकाळी काही रिक्षाचालकांची कागदपत्रे कचऱ्यात टाकून कागदपत्रे नाहीत, तेव्हा तक्रारी दाखल करतो असा मुजोरीचा पावित्रा पोलिसांनी घेतल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे संतापाचा कडेलोट होऊन त्यांनी आंदोलन करण्यासोबतच स्वामी नारायण पोलिस चौकीला घेरावही घातला.

दरम्यान बेशिस्त वर्तन करणे, प्रवाशांशी मुजोरीची भाषा करणे, वाहतुकीला अडथळा होईल असे वर्तन करणे, कमाल मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, गणवेश व बिल्ला नसणे या संदर्भात प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर मागील काही दिवसांपासून पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई सुरू केली.

अनेक रिक्षाचालकांवर कारवाईही करण्यात आली, मात्र सर्व काही व्यवस्थित असताना, कागदपत्रे ठिक असताना काही पोलिस अधिकारी व कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ अपेक्षेने रिक्षाचालकांना जाणूनबुजून त्रास देत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना रिक्षाचालक निवेदन देणार आहेत. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा अनेक रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवत या प्रकाराचा निषेध नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

*