तांत्रिकाने तरुणीवर टाकले जाळे; नाशिक पोलिसांनी बंद केले चाळे

0
नाशिक (प्रतिनिधी) ता. १४ : भोंदू तांत्रिक, मंत्रतंत्र, जादू टोणा वगैरेंच्या नादी लागले तर काय होऊ शकते याचा प्रत्यय नाशिकमधील या घटनेमुळे आला असून सर्वांनी याबाबत सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

भोंदू तांत्रिकाने मुलीच्या वडिलांना जादू टोण्याच्या साह्याने जीवे मारण्याची धमकी देत तिला चोरी करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना आज नाशिक पोलिसांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे १० तारखेला सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत नितीन फिरोदिया यांच्या घरातून चोरीला गेलेल्या १४ लाख रुपये रोख आणि १५ तोळे सोने यांचा तपास लागला आहे.

ही चोरी श्रीमती फिरोदिया यांच्या मैत्रिणीच्या मुलीने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून तिच्या आईवडिलांनी हा ऐवज फिरोदिया यांना परत केला आहे. तर या मुलीला फूस लावून चोरी करण्यास भाग पाडणाऱ्या वांगणी येथील भोंदू बाबा उदयराज रामआश्रम पांडे, रा. वांगणी, बदलापूर याला कल्याण येथून ताब्यात घेतले.

त्याच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यासह चोरीचेही कलमे लावली आहेत. त्याने आतापर्यंत अनेकांना फसविले असून त्याच्या अटकेमुळे अनेक तरुणींचे आयुष्य उद्धवस्त होण्यापासून बचावले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतल्यानंतर मिळालेली माहिती धक्कादायक आहे. या तरुणीच्या घरी आणि दुकानात वांगणी येथील भोंदू बाबाकडून मन:शांतीसाठी तांत्रिक पुजापाठ करण्यात आला होता. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी १ लाख दहा हजार रुपयेही उकळले. त्यानंतर पुजा सुरू असताना दिवा विझल्याने त्याने अपशकुन होणार असे नाटक केले. तसेच खंडित दिवा घरात ठेवण्यास सांगितले.‍ मात्र त्यास तरुणीच्या आईने नकार दिला.

त्यामुळे त्याने तरुणीला धमकावले की जर पुढे पुजा सुरू ठेवली नाही, तर तुझे वडील मरतील, तसेच तिला आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिला घरातून ४ लाख रुपये आणि दागिने चोरून आणण्यास सांगितले.

त्यानंतरही तो धमकी देत राहिला आणि फिरोदियांकडे त्याने तिला चोरी करण्यास सांगितले. नाशिक पोलिसांच्या सतर्कतेने आणि कौशल्याने अखेर हा भोंदू जाळ्यात सापडला.

LEAVE A REPLY

*