महासभेत विरोधकांचा गोंधळ अन् सत्ताधार्‍यांचा सावळागोंधळ

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी
गेल्या बुधवारी शहरात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे सराफ बाजारासह अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचे संकट नाशिककरांसमोर उभे राहिले होते.

यासंदर्भात आजच्या महापालिका महासभेत मांडण्यात आलेल्या लक्षवेधीच्या चर्चेवरून सुरुवात आणि शेवट अभूतपूर्व गोंधळात झाला. पाच-साडेपाच तास चालेल्या महासभेत विरोधकांचा गोंधळ लक्षात घेत महापौर रंजना भानसी यांनी लक्षवेधीवर कोणताही निर्णय न देता विषयपत्रिकेवरील विषयांना नियमानुसार मंजुरी देत सभा संपवली.

विरोधकांनी धिक्कार असो, सत्ताधिकार्‍यांचा धिक्कार असो, महापौरांचा निषेध असो अशा घोषणा देत निषेध केला. असा विरोधकांचा गोंधळ आणि सत्ताधार्‍यांच्या सावळागोंधळात नाशिककरांच्या दृष्टीने संवदेनशील बनलेला विषय मागे पडला.

गेल्या बुधवारच्या पावसामुळे सराफ बाजार व बहुतांशी भाग पाण्याखाली गेला. या गंभीर प्रश्नावर विरोधकांनी शहरातील पाणी संकटामुळे झालेले नुकसान व उपाययोजना करण्याबाबतची लक्षवेधी शक्यतेनुसार आजच्या महासभेत चांगलीच गाजली. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या उपस्थितीत आजची महासभा गोंधळात पार पडली.

आजच्या सभेची सुरुवात विरोधकांच्या गोंधळातून झाली. सभेत प्रारंभी विषयपत्रिकेनुसार कामकाजास सुरुवात झाल्यानंतर अगोदर लक्षवेधी घ्या नंतर विषयपत्रिका अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, शाहू खैर यांनी केली.

त्यावर महापौर दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वच विरोधक नगरसेवकांनी थेट महापौरांच्या समोर मोकळ्या जागी धाव घेत लक्षवेधीचा आग्रह धरला. शहराच्या दृष्टीने संवेदनशील बनलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करा, अशी मागणी करीत विरोधकांकडून सुरू झालेल्या गोंधळामुळे विषयपत्रिका महापौरांना मागे घेणे भाग पाडले.

विरोधकांच्या लक्षवेधीवर चर्चा सुरू झाल्यानंतर रा.काँ. गटनेते शेलार यांनी ‘येरे येरे पावसा, पाऊस आला मोठा, महापालिकेचा पैसा झाला खोटा’ या कवितेची आठवण करून दिली. भूमिगत व पावसाळी गटारीचा पैसा पाण्यात वाहून गेल्याचे सांगत शेलार म्हणाले, शहरात 1300 कोटी रुपयांचे भूमिगत गटारींचे काम झाले तेव्हापासून हे पाईप साफ झालेले नाहीत. सरस्वती नाला बंदीस्त झाला तेव्हापासून नाला साफ झालेला नाही.

महासभेला आंधारात ठेवून भद्रकाली मलनिस्सारण केंद्राचे काम झाले. पावसाळी गटारीचे मूळ काम द्वारका अमरधाम असे असताना ते भद्रकालीकडे वळवण्यात आले. हे काम सल्लागार कंपनीने दिलेल्या अहवालाप्रमाणे नेले तरच सराफ बाजार व परिसरातील नागरिक सुरक्षित राहू शकतील. नाहीतर दुसर्‍या मजल्यापर्यंत पावसाने पाणी जाण्याची भीती आहे.

भद्रकाली येथील पंपिंग व शौचालये हलवण्याचे काम तातडीने करावे. यावर आताच उपाययोजना कराव्यात. भूमिगत गटारीचे ऑडिट करावे. चुकीच्या पद्धतीने काम केल्याने हा खर्च झालेला पैसा अधिकारी व ठेकेदारांकडून वसूल करावा. हा पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशाराही शेलार यांनी दिली.

शहरातील पावसाळी गटार योजना सदोष झाल्याचे सांगत काँग्रेस गटनेते शाहू खैरे म्हणाले, ही पावसाळी गटार योजना सदोष असल्याचे परिणाम बुधवारी झालेल्या पावसात नाशिककरांना बघायला मिळाले.

यात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर याच भागातील सदोष रस्त्यांमुळे दहीपूल व परिसरात पाणी साचते. त्याचबरोबर भद्रकाली येथील सिवरेज चुकीच्या पद्धतीने बांधले गेले असून याचा विचार होणे गरजेचे आहे.

सराफ बाजारातील सुलभ शौचालय हे नाल्यावर बांधण्यात आले असून तेथे गटार व पावसाचे पाणी अडत असल्याने तातडीने हे शौचालय हलवावे. बुधवारी शहरात पावसामुळे जे काही घडले ते पुन्हा होणार नाही अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

पावसाळापूर्व कामांचे पितळ बुधवारच्या पावसाने उघडे केल्याचे सांगत लक्षवेधीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, शहरातील 300-350 कि. मी. पावसाळी गटार योजनेचे पातक समोर आले आहे. योजना कुठे आहे? पाण्याचा निचरा का होत नाही? पावसाळापूर्व कामाचे ठेके कसे दिले? त्यांना ऑर्डर का दिल्या नाहीत? यामागील गुपीत काय आहे ? यातून शहराला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. याचे गुपीत प्रशासनाने महासभेत सांगितले पाहिजे.

ज्या पंतप्रधान कार्यालयाने नाशिकची स्मार्ट सिटीत निवड केली त्याच कार्यालयातून महापालिकेच्या दोन अधिकार्‍यांच्या चौकशीचे पत्र येते ही शरमेची बाब आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली असून त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली.

महापालिका मुख्यालयाची इमारत ही पुरंदरे नाल्यावर उभी असल्याचा आरोप करीत डॉ. हेमलता पाटील यांनी शहरातील नाले बुजवण्यास नगररचना व महापालिकेला जबाबदार धरले. याबाबत बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, शहरातील नाल्यांची माहिती आपण सहा वर्षांपूर्वी लेखी स्वरुपात मागितली होती. तेव्हा शहरात 18 नाले असल्याचे सांगण्यात आले.

आम्ही या नाल्यांचा शोध घेतला असता फक्त तीन नालेच दिसले. जुन्या नकाशात तपासले असताना या नाल्यावर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या असल्याचे समोर आले. याच अतिक्रमणामुळे शहरात पाणी साचत आहे. हवामान खाते पावसाचा अंदाज देते, मग पावसाळापूर्व नाले, गटारी सफाई का झाली नाही? या कामाची वर्क ऑर्डर 16 जूनला का दिली? यात दिरंगाई का झाली? पावसाळी गटारीच्या पाईपलाईनला आऊटलेट नाही, ढाप्यांवर डांबर पडून ते चोकअप झाले असून याचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

शहरातील प्लॅस्टिक पिशव्या विक्रेत्यांची माहिती प्रशासनाकडे आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक सापडले असताना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, असे प्रश्न उपस्थित करीत सत्यभामा गाडेकर म्हणाल्या, नाल्यांवर झालेल्या बांधकामांना नगररचना विभागाने परवानगी कशी दिली? त्या अधिकार्‍यांवर कारवाई का केली नाही, असे प्रश्न आता पावसामुळे उपस्थित झाले आहेत. शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत यात नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. 50 टक्के करूनच पावसाळापूर्व कामांची बिले घेतली जात असल्याचा आरोप मनसेना गटनेते सलीम शेख यांनी केला.

पावसाळापूर्व सफाईची कामे ही सबठेकेदारांना दिली जातात. त्यामुळे सफाई केली जात नाही. शहरात आलेल्या पाणी संकटाचे हेच कारण असल्याचे सांगत शेख म्हणाले, पेस्ट कंट्रोलच्या फवारणीची हीच अवस्था असून नऊ महिन्यांत आपल्या भागात केवळ दोनवेळा फवारणी झाली असून नगरसेवकांना अशी वागणूक तर सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित करीत अशाप्रकारे काम करणाार्‍या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगररचना विभागाने शहराला कोठे नेऊन पोहचवले? असा गंभीर आरोप भाजपच्या नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केला. डॉ. पाटील यांनी दिलेल्या लक्षवेधीचे अभिनंदन करीत कुलकर्णी म्हणाल्या, बुधवारच्या पावसामुळे इंदिरानगर, राजीवनगर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

शहरात पाण्याचा निचरा होत नसून रेन वॉटर हार्वेस्टिंगवर कोणीच बोलत नाही. माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी नवीन इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासंदर्भात निर्णय दिला होता. मात्र बांधकाम व्यावसायिक हे का करीत नाहीत? रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बंधन असताना बांधकामाच्या परवानग्या कशा दिल्या जातात? झाडे लावण्याचे बंधन असताना झाडे का लावली जात नाहीत? तेव्हा नगररचना विभागाची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.

कल्पना पांडे यांनी नगररचना विभागावर टीका केली. आपल्या प्रभागातील नाला बंदीस्त करण्यास सांगितले असताना त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. मात्र बांधकाम व्यावसायिक व नगररचना अधिकार्‍यांची मीटिंग झाली की नाले बंदीस्त होतात, असेही त्यांनी सांगितले. महापौरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नगरसेवकांना 75 लाखांचा निधी भेट द्यावा, अशी मागणी पांडे यांनी केली.

नाले सफाईचे काम जून महिन्यात का दिले जाते, असा प्रश्न उपस्थित करीत माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, आपल्याला प्लॅस्टिकमुक्त शहर करायचे म्हणून आपण एकीकडे काम करीत आहोत. मग एवढे 45 टन प्लॅस्टिक कसे सापडले? नाले सफाई का झाली नाही? अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.

तेव्हा या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी भाजपकडून बुधवारच्या पावसामुळे जे काही झाले ते गंभीर्याने घेण्यात आले नसल्याचे सांगत सुवर्णा मटाले म्हणाल्या, घटनेनंतर महापौरांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली असती तर यावर लक्षवेधी मांडली गेली नसती.

पावसाळापूर्व कामे झाली असती तर लोकांचे नुकसान झाले नसते. नैसर्गिक नाले बुजवल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले. आता या ठिकाणी पाईपलाईन टाकाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी विरोधकांची नावे घेत कशा प्रकारे भूमिका बदलली जाते याचा उलगडा केला. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहत महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करत सभा संपवली.

LEAVE A REPLY

*