खूशखबर : नाशिक जिल्हा बँकेचा चलनतुटवडा संपणार; अर्थमंत्रालयाचे रिझर्व बँकेला निर्देश

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. २१ : सहकारी बँका आणि पोस्ट कार्यालये त्यांच्याकडील जुन्या ५०० आणि हजाराच्या नोटा आता रिझर्व बँकेकडे जमा करू शकणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने या संदर्भात रिझर्व बँकेला अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता रिझर्व बँकेकडे ३० दिवसांच्या आत या जुन्या नोटा जमा करता येणार आहेत.

अनेक सहकारी आणि जिल्हा बँकांकडे जुन्या नोटा जमा झाल्या, पण त्या बदलण्यावर बंधने आल्याने या बँकाकडे रोकड टंचाई निर्माण झाली. त्यातून शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

नोटबंदीनंतर सहा महिन्यांपर्यंत ही स्थिती होती. यामुळे आता नाशिक जिल्हा बँकेसह अनेक जिल्हा बँकांतील चलन तुटवड्याचा प्रश्न आता मिटणार असून शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे, शिक्षकांचे पगार, कर्जवितरण आदी गोष्टी सोप्या होणार आहेत.

नाशिक जिल्हा बँकेकडे असे ३४२ कोटी रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात आहेत. अद्याप या संदर्भात कोणतेही पत्र जिल्हा बँकेला मिळाले नसून ते आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी देशदूतला दिली.

LEAVE A REPLY

*