जिल्हा बँकेतील कामकाज नियोजनबद्ध करणार : बकाल

जिल्हा बँक सीईओ पदभार स्वीकारला

0

नाशिक । दि. 19 प्रतिनिधी – अर्थ व्यवहार सुरळीत ठेवून उलाढालीतून कर्ज वितरण आणि त्याची रितसर वसुली हे कोणत्याही वित्तीय संस्थेचे नियोजन असते. ते जर बिघडले तर बँकेच्या अर्थ अरोग्यावर दुष्परिणाम होतात.

नेमकी हीच बाब जिल्हा बँकेच्या बाबतीत घडली आहे. अर्थ व्यवहारातील नियोजन विस्कळीत झाल्याने जिल्हा बँक तंगीत आली आहे. नियोजनबद्ध कामकाजाची घडी बसवणार असल्याचे जिल्हा बँकेचे नवनियुक्त सीईओ राजेंद्र बकाल यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर राजेंद्र बकाल यांनी थकित कर्जे आणि त्याची वसुली यावर प्राधान्यक्रमाने लक्ष देणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, शिखर बँकेने आपल्याला बँकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठीच जिल्हा बँकेवर प्रशासनप्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती, त्यांचे उत्पन्न आणि थकित कर्ज याची यादी तयार करून त्यांचे निकषानुसार प्राधान्यक्रम तयार करण्यात येणार आहेत. जे शेतकरी शासनाच्या निकषात बसतील अशा शेतकर्‍यांना शासनाच्या निर्णयाचा फायदा मिळवून देण्यासाठी बँकेने कामकाजाला सुरुवात केली आहे.

जिल्हा बँकेवर अगोदरच खातेदारांचा मोठा भार आहे. त्यामुळे खातेदार शेतकर्‍यांमधून नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची पत निश्चित करण्यात येणार आहे. त्यापैकी काही शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीककर्ज मिळवण्यासाठी प्रक्रिया करण्यात यावी यासाठी ना हरकत दाखले देण्यास जिल्हा बँक तत्परता दाखवणार असल्याचे बकाल म्हणाले.

जिल्हा बँकेकडे शिखर बँकेचे 920 कोटी रुपये अडकले आहेत. त्याचबरोबर पीककर्जाचे सुमारे 1250 कोटी रुपये थकित आहेत. तर शेतकर्‍यांनी दीर्घ मुदतीचे 200 कोटी रुपये कर्ज घेतले आहे. बँकेचा घसलेला पत दर्जा थकित कर्जांमुळे अधिक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची ही बँक वाचवण्यासाठी वसुलीवर प्रामुख्याने भर देण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी बँकेला कठोर वागण्याची गरज आल्याचे बकाल म्हणाले.

कठोर अंमलबजावणीची वेळ
जिल्हा बँक आर्थिक डबघाईस येण्यास कारण म्हणजे बँकेचा कारभार नियोजनाला हरताळ फासून केलेले कामकाज ठरले आहे. संपूर्ण जिल्ह्यात व्याप्ती असलेल्या एनडीसीसीला वाचवण्यासाठी प्रशासनप्रमुख म्हणून कठोर निर्णय घेण्याची आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी केलेली आहे. शासनाने त्यासाठी आपल्याला जिल्हा बँकेवर पाठवले आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बकाल यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप करणार्‍यांना चाप लावण्याचे संकेत बकाल यांच्या बोलण्यात मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

*