आश्चर्यच्‌ ! काशी एक्स्प्रेसवरून ठरते नांदगावच्या सिटी सर्व्हे कार्यालयाची वेळ

0

नांदगाव, दि. १३ ( मारुती जगधने) : एखाद्या सरकारी कार्यालयाची वेळ रेल्वेगाडी ठरवते असा मथळा वाचून विश्वास बसत नसेल, पण हे खरे आहे.

नांदगावच्या भूमापन अर्थातच सिटी सर्व्हे कार्यालयाची वेळ दररोज येथील स्टेशनवर येणारी काशी एक्सप्रेस (मुंबई वाराणसी एक्स्प्रेस) ठरवते.

याचे मुख्य कारण म्हणजे येथील दुय्यम निबंधक बाहेरगावी राहतात आणि याच एक्स्प्रेसने नांदगावला येतात. ही गाडी येथे दुपारी १२.३० ला येते. त्यानंतरच हे कार्यालय सुरू होते. कामकाजाची ठरलेली वेळ मात्र सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी १ ते ५.३० अशी आहे.

ज्या दिवशी काशी एक्स्प्रेस उशिरा येते, त्या दिवशी अर्थातच दुय्यम निबंधकाना येण्यास उशीर होतो आणि कार्यालय आणि तेथील कामकाज उशिरा सुरू होते.

यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत कार्यालयाला भेट दिली, तेव्हा कार्यालयाला टाळे लागलेले दिसले.

तेथे ताटकळत असलेल्या नागरिकांमध्ये काशी एक्सप्रेस कधी येणार याची चर्चा होताना दिसली.  नागरिकांच्या म्हणण्यानुसार बऱ्याचवेळा काशी एक्सप्रेस आली की नाही हे ते कार्यालय उघडे आहे की नाही यावरूनच कळते. कार्यालय उघडले, तर संबंधित गाडी येऊन गेली असाही अंदाज ते लावतात.

आपल्या नोंदी आणि अन्य कामे होत नसल्याचे नागरिकांनी तक्रारीही केल्या पण नवीन बदलेलेल्या फडणवीस शासनात या बाबतीत त्यांचे ‘अच्छे दिन’ अजूनही आलेले नाहीत.

दरम्यान यासंदर्भात दुय्यम अधिकारी परदेशी यांचे म्हणणे वेगळेच आहे. ते म्हणतात की मला कोर्टाची कामे असल्याने आणि कार्यालयात एकटाच असल्याने कार्यालय बंद करून जावे लागते.

नांदगावकर मात्र या उत्तरावर समाधानी नाहीत. काशी एक्स्प्रेसच्या वेळेपर्यंतच कोर्टात कामे होतात का? असा खोचक प्रश्न आता ते विचारत आहेत.

LEAVE A REPLY

*