मुसळगाव सेक्स रॅकेट : सिन्नर पोलिसांनीच दिली तक्रारदाराला धमकी, वाचा पुढे काय झाले?

आयजींच्या दणक्याने हालली सूत्रे; पळवलेली विवाहिता बांगलादेशात पोहोच

0

नाशिक । दि.29 प्रतिनिधी – पत्नीस पळवून नेऊन अनैतिक व्यवसायासाठी तिची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार करणार्‍या तरुणाची दखल न घेता उलट त्यालाच गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्‍या सिन्नर पोलिसांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दणका दिला.

या दणक्याने पोलीस तसेच दलालांमध्ये खळबळ उडाली असून महिनाभरापासून गायब केलेल्या संबंधित विवाहित युवतीस थेट तिच्या बांंगलादेश येथील घरी पोहोच करण्यात आल्याचे समजते.

सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील महिला वेश्या दलाल व तिच्या मुलाने आपल्या बांगलादेशी पत्नीस पळवून नेत तिला वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवल्याची तक्रार नाशिक येथील युवक जमील शेख याने एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच सिन्नर पोलीस ठाण्यात केली होती.

परंतु  तेथील वेश्या दलालांशी असलेल्या लागेबांध्यांमुळे या पोलीस ठाण्याच्या कर्त्याकरवित्या अधिकार्‍यांनी त्याच्या तक्रारीकडे  दुर्लक्ष केले. तर त्याचा पाठपुरवा करताच, तू चांगल्या लोकांना विनाकारण बदनाम करत असून तक्रार मागे घे अन्यथा तुझ्यावरच गुन्हे दाखल करू अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.

सिन्नर पोलीस दाद देत नसल्याचे पाहून शेख याने आपल्या पत्नीस वाचवण्याबाबत  जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना तसेच पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले होते.

जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी सिन्नर व एमआयडीसी पोलीसांना या प्रकरणी विशेष तपास करून सर्व प्रकार उघड करण्यास तसेच सबंधीत तरूणाच्या पत्नीस सोडविण्याचे आदेश दिले होते.

मात्र एमआयडीसी तसेच सिन्नर पोलिसांनी यावर काहीच कारवाई केली नव्हती. उलट आम्ही मुसळगाव येथे संबंधिथ वेश्या अड्ड्यावर धाड टाकली. परंतु एकही बांगलादेशी मुलगी अथवा महिला आढळून आली नसल्याचे त्यांनी अधिक्षकांना स्पष्ट केले.

यासह सबंधीत युवकच कसा चुकीचा असून त्याच्या बोलण्यात विसंगती आढळत आहे. त्याने दिलेले मोबाईल क्रमांकाचे रेकॉर्ड काढले असून त्याच्या पत्नीकडे असलेल्या मोबाईलचे लोकेशन सध्या वेस्ट बंगाल, मनिपूर येथे येत असल्याचे सांगीतले.

तरूणाच्या बोलण्यात विसंगती असल्याने त्याने केलेली वेश्या दलालांविरोधातील तक्रार खोटी असल्याचा व ही केस निकाली काढल्याचा अहवाल जिल्हा अधिक्षकांना देण्यात आला होता.

पोलीसांवर पूर्ण विश्वास ठेवणार्‍या अधीक्षकांनाच गोलमाल करण्याचा प्रयत्न सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी याद्वारे केला.

सिन्नर व एमआयडीसी पोलिसांकडून दाद मिळत नसल्याने अखेर शेख याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विनय चौबे यांची भेट घेत आपबीती कथन केली.

तसेच सिन्नर पोलीसांनी दिलेला अहवाल दाखवून ते अधिक्षकांना कसे बनवत आहेत याबाबतचे कथन केले. हे प्रकरण गंभीर असल्याचे पाहूण चौबे यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षकांना तातडीने कारवाई करून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.

याची कुणकुण सिन्नर पोलीस तसेच त्यांच्या दलालांना लागताच कारवाईच्या भीतीपोटी दलांलांनी काही दिवसांपूर्वी परस्पर शेख याच्या पत्नीस बांगलादेश येथे तिच्या आईवडिलांच्या हवाली केल्याचे समजते.

दहशतवादी ठरवण्याची धमकी

आपल्या पत्नीस वेश्या दलालांकडून वाचवण्याची विनवणी करणार्‍या जमील शेख यासच उलट्या धमक्या एमआयडीसी पोलिसांकडून देण्यात आल्या. तक्रार अर्ज मागे घे तसेच हे प्रकरण विसरून जा.

अन्यथा तुझ्यावर दहशतवादी असल्याचा गुन्हा दाखल करून तुला कायमचे तुरूगांत पाठवूफ अशी धमकी देण्यात आल्याचे जमील शेख याने सांगितले. याची तक्रार त्याने विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

*