डॉक्टरच्या इन्होवामध्ये व्हायची अनधिकृत सोनोग्राफी; नाशिक मनपाने केली कारवाई

आपली मुलगी वेबसाईटवरील तक्रारीवरुन तपासणीत

0

नाशिक । दि.20 प्रतिनिधी

शहरातील सातपूर भागात असलेल्या एका डायग्नोस्टीक सेंटरच्या मालकीच्या वाहनात रुग्णांची सोनोग्राफी केली जात असल्यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार महापालिका वैद्यकिय विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली.

यात वाहनात गर्भलिंग निदानाकरिता लागणारे साहित्य व मशिन आढळून आल्यानंतर संबंधीत सेंटर मधील सोनोग्राफी मशिन सील करण्यात आले आहे. तसेच संबंधीत डॉक्टराला महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात अनाधिकृतपणे गर्भलिंग निदान करुन स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याचा प्रकार काही महिन्यापुर्वी घडला होता. यात महापालिकेने मुंबईनाका भागातील एका खाजगी रुग्णालयावर कारवाई केल्यानंतर डॉक्टराला अटक केली होती.

त्यानंतर अलिकडेच जिल्हा रुग्णालयात देखील बेकायदा गर्भपात केल्याचे उघडकीत असल्यानंतर डॉ. लहाडे यांना संशयित म्हणुन अटक झाली होती. या दोन्ही घटनांनी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपातावर आळा बसला गेला होता.

असे असतांना महानगरपालिका कार्यक्षेत्रात पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट 1994 व सुधारीत 2003 नुसार ‘आमची मुलगी’ या वेबसाईटवर डॉ. तुषार पाटील यांच्यासंदर्भात एक तक्रार आली होती. याच तक्रारीच्या तपासात हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

यात डॉ. पाटील यांच्या शाकुतल डायग्नोस्टीक सेंटर (एम एच बी कॅालनी सातपुर) यांच्या मालकी वाहनाबाबत आपली मुलगी वेबसाईटवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर या केंद्राची तपासणी डॉ आरती चिरमाडे, डॉ विजय देवकर व डॉ जितेंद्र धनेश्वर यांच्या पथकाने तपासणी केली.

याठिकाणी असलेल्या डॉ. तुषार पाटील यांच्या मालकीच्या ईनोव्हा क्र एम एच 15 बी डब्लु 5949 या वाहनाच्या तपासणीत  वाहनाच्या डीक्कीमध्ये रुग्णांची सोनोग्राफी करण्याकरिता एक गादी पसरवलेली असल्याचे दिसुन आले. तसेच याठिकाणी सोनोग्राफी करण्याकरिता लागणारे दोन प्रोब, सोनी व्हीडीओग्राफीक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, 2 उश्या, वेगवेगळे वायर कनेक्टेड, युपीएस, कि बोर्ड, सोनोग्राफी जेल, टीश्यु पेपर इ.साहित्य आढळून आले.

डॉ. पाटील यांनी हे साहित्य त्रंबक येथील नोंदणीक़त केंद्रावरुन आणल्याचे तपासणीत आढळून आले. या एकुणच आढळून आलेल्या साहित्यावरुन डॉ. पाटील यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसार डॉ.तुषार पाटील यांना महापालिकेकडुन कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीवर डॉ. पाटील यांनी सादर केलेला खुलासा व त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सल्लागार समीतीवर सादर केले होते. मात्र  डॉ पाटील यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार कार्यवाहि करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. पाटील यांच्यावर कार्यवाहीकरीता महापालिकेकडुन अति. संचालक पुणे तथा राज्य समुचित अधिकारी यांनी पत्र पाठविण्यात आले आहे. या एकुणच कारवाईनुसार आज (दि.20) रोजी डॉ. पाटील यांचे शांकुतल डायग्नोस्टीक सेंटर (एम एच बी कॅालनी सातपुर) मधील सोनोग्राफी मशीन महापालिका वैद्यकिय विभागाच्या डॉ. आरती चिरमाडे डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. सुवर्णा शेफाळ यांनी पंचाच्या समक्ष सिल केले. या केंद्राची महापालिकेकडील नोंदणी निलंबीत करण्यात आलेली आहे. त्यानंतर संबंधी डॉक्टरविरुद्द  न्यायालयीन कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महापालिका वैद्यकिय विभागातून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*