इगतपुरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र

0

इगतपुरी । दि १५ प्रतिनिधी –

इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या तीन ग्रामपंचायत सदस्यांना नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी अपात्र केले आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजात विविध प्रकरणी आरोप करून ग्रामपंचायत सदस्य दत्तू बाजीराव काळे यांनी निवडणूक विवाद दावा दाखल केला होता.

जिल्ह्याच्या इतिहासात दीर्घ २१ वेळा सुनावणी झालेल्या या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केला. अपात्र झालेल्या सदस्यांत भाजप नेत्याची पत्नी आणि समर्थक असल्याने इगतपुरी तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच तथा सदस्या अलका संपत काळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलाच्या नावे ठेकेदारीची कामे केली. शिवाजी नंदू मेंगाळ ह्या ग्रामपंचायत सदस्याने शौचालय नसतानाही दिशाभूल केली.

यासह ठेकेदार म्हणून कामे केली. महिला ग्रामपंचायत सदस्य अलका चंद्रकांत पगारे यांनी शौचालय न बांधता दिशाभूल केली. या तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांविरोधात ग्रामपंचायत सदस्य दत्तू बाजीराव काळे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह निवडणूक विवाद दावा दाखल केला होता.

जिल्ह्याच्या इतिहासात २१ वेळा दीर्घकाळ चाललेल्या ह्या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेण्यात आला. तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांवर केलेले आरोप सिद्ध झाल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विद्यमान उपसरपंच अलका संपत काळे, शिवाजी नंदू मेंगाळ, अलका चंद्रकांत पगारे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरवून रद्ध केले असल्याचा निकाल दिला.

इगतपुरी तालुक्यातील भाजपचे नेते संपत काळे यांच्या सुविद्य पत्नी उपसरपंच अलका काळे यांच्यासह इतर दोन समर्थकांचे पद रद्ध झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीत भाजपचे संख्याबळ १ वर आले असून याही सदस्यांवर दावा दाखल असल्याने त्यावर टांगती तलवार आहे. दत्तू काळे यांच्यातर्फे ऍड. डी. एस. निकम यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान ह्या प्रकरणी पिंपळगाव मोर सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ काळे, ग्रामस्थ संपत कदम, शिवाजी काळे, उमेश बेंडकोळी, धनराज बेंडकोळी, गोटीराम काळे, जीवन गातवे, रमेश कदम, नंदु बांगर, भरत बेंडकोळी, शाम कुलाळ, रमेश बेंडकोळी, जगन बेंडकोळी, लक्ष्मण काळे, गणपत कदम, राजाराम काळे आदींनी निकालाचे स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी केली.

ग्रामपंचायत कायद्याचा भंग करून गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याने चपराक लगावली आहे. दाव्यात शासनाच्या काही मंत्र्यांना हाताशी धरून दबाब आणण्याचा संबंधितांनी केलेला प्रयत्न न्यायदेवतेने झुगारून लावला.

– दत्तू बाजीराव काळे, ग्रामपंचायत सदस्य तथा याचिकाकर्ते.

LEAVE A REPLY

*