नाशिक। दि.4, प्रतिनिधी
विद्युत रोषणाईने उजळून निघालेला गुरूव्दाराचा परिसर, मंदिर भागात उभारलेला शामियाना, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी प्रवचन, शिस्तबध्द पध्दतीने सुरू असलेला लंगरचा कार्यक्रम या व अशा अनेक उपक्रमांनी शिख धर्माचे संस्थापक गुरूनानक यांची 548 वी जयंती मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली होती. सकाळपासूनच शहरातील गुरूव्दारांच्या आवारात या कार्यक्रमासाठी शिख बांधव एकत्र आले होते.

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानक यांच्या 548 व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध गुरूव्दारांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते. देवळाली शहरातील गुरुद्वारा येथे शुक्रवारी भाई बलजितसिंगजी यांच्यासह लहान मुलांसाठी विशेष कीर्तन झाले तर सायंकाळी 5 ते 6.30 व सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान कीर्तन सेवा झाली.

शनिवारी (दि. 4) गुरुद्वारात पहाटे 5 वाजता आसा दी वार कीर्तन, सकाळी 11 ला भाई सुरिंदरसिंगजी यांचे कीर्तन, 12 वाजता भाई बलजितसिंगजी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान कीर्तन-भजनादी कार्यक्रम झाले. दोन्ही दिवस दुपारपासून लंगरचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान शहरातील शिंगाडा तलाव गुरूव्दारातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शुक्रवारी सकाळच्या सत्रात भाई हरदीपसिंग, भाई गुरुचरणसिंग यांचे कीर्तन, ग्यानी लखवीरसिंग यांचे कथा व प्रवचन झाले.

तर सायंकाळी श्री रहेरदासजी, भाई हरदीपसिंग, भाई गुरुचरणसिंगजी व गुरुमत विचार ग्यानी लखवीरसिंग यांचे प्रवचन रंगले शनिवारी गुरूनानक जयंतीच्या सोहळ्यास प्रारंभ झाल्यानंतर दुपारी प्रवचन आणि लंगर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर सायंकाळी पारितोषिक वितरण झाले. या सर्वच कार्यक्रमांना शिख बांधवांनी मोठया प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. वाहे गुरूदा खालसा वाहे गुरू दी फतेहचा जयघोष या गुरूव्दारांमध्ये सुरू होता.

 (सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)

LEAVE A REPLY

*