महिना उलटूनही कर्जमाफीची प्रतीक्षाच

0

नाशिक । दि. 20 प्रतिनिधी
गेल्या 18 ऑक्टोबरला मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महिन्यानंतरही कर्जमाफीच्या अर्जांची छाननी माहिती अपलोडचेच काम सुरू आहे. त्यामुळे अद्यापही शेतकर्‍यांचे खाते निरंकच असल्याचे दिसून येते.

दिवाळीत कर्जमाफी करण्याची घोषणा झाली. विरोधी पक्षांतर्फे आंदोलने झाली. दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 30 शेतकर्‍यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पुन्हा 879 पात्र लाभार्थ्यांची ग्रीन यादी शासनामार्फत प्राप्त झाली.

तर दीड लाखाप्रमाणे 3 कोटी 70 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र दिवाळी होऊन महिना उलटला तरी अद्याप शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळू शकलेला नाही. तालुकास्तरीय समितीच्या अहवालानंतरच प्रत्यक्षात संबंधित शेतकर्‍यांंच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात 1 लाख 89 हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले असून त्यापैकी सुमारे 1 लाख 6 हजार शेतकरी पात्र ठरले. मात्र नेमके यात कोणाला कर्जमाफी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर व जळगाव जिल्ह्यांत शेतकर्‍यांची संख्या जास्त असल्याने माहिती अपलोड करण्याचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. त्यामुळे 5 लाखाहून अधिक शेतकर्‍यांची माहिती सहकार विभागाकडे अद्ययावत व्हायची आहे.

यादीत त्रुटी
सरकारने जाहीर केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत त्रुटी असल्यामुळे सरकारला ती यादीही संकेतस्थळावरून हटवावी लागली. वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपासणी करूनही शेतकरी कजर्माफीच्या याद्या काही अंतिम होत नाहीत. त्यामुळे आता शेतकर्‍यांमध्ये कर्जमाफीविषयी रोषच वाढतो आहे. यादीतही पती-पत्नी दोहोंना लाभ मिळतो का, त्यांंना दीड लाखापेक्षा अधिक रकमेची कर्जमाफी मिळते का, अशा अनेक त्रुटी अजून दूर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकांना नव्याने यादी अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण त्या सूचना कागदावरच आहेत.

LEAVE A REPLY

*