एक गाय आणि अर्धा एकरमध्ये यशस्वी शेतीचा मूलमंत्र

अल्पभूधारक शेतकरी नामदेव मोळे यांच्या यशकथेचे आयोजन

0

नाशिक, ता. ८ : एक गाय आणि अर्धा एकर शेती असेल, तर योग्य तंत्राचा वापर करून शेती फायद्याची करता येते हे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी सप्रयोग दाखवून दिले आहे.

कोल्हापूरचे शेतकरी नामदेव मोळे आणि मोरोपंत पिंगळे त्यापैकीच एक. या शेतकऱ्यांची यशकथा समजावून घेण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

शनिवार दिनांक १० जून रोजी जनकल्याण समिती नाशिकच्या वतीने सकाळी १० वाजता गिरणारे गाव, ता. नाशिक आणि सायं 7 वाजता विवेकानंद सांस्कृतिक मंडळ, बापू बंगला, इंदिरानगर येथे या शेतकऱ्यांची प्रकट मुलाखत, संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

घरपण (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील नामदेव आकाराम मोळे हे केवळ 30 गुंठे जमीन असलेले शेतकरी.  परंतु उपलब्ध जमीन आणि गीर गाईच्यासंगोपनातून त्यांनी कृषी प्रगती साधली आहे. सेंद्रिय गूळ निर्मिती, दूध विक्री त्याचबरोबरीने गांडूळखत आणि आयुर्वेद औषधींमध्ये हमखास वापर होणाऱ्या गोमूत्र अर्क विक्रीतून त्यांनी गावातच उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षांत परिसरातील ऊस कारखान्यांमुळे बरेचसे शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी ऊस शेतीकडे वळले असताना प्रतिकूल परिस्थितीत हा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबवून महाराष्ट्रातील अल्पभुधारक शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

पुण्यातून त्यांनी एक भाकड गीर गाय आणून तिच्यावर उपचार म्हणून गाईचेच पंचगव्य देऊन तिला गाभण ठेवल्याचा प्रवास उपस्थितांना या कार्यक्रमात ऐकता येईल.

गाईचे योग्य व्यवस्थापन ठेवल्याने दररोज सकाळ – संध्याकाळ मिळून दहा लिटर दूध मिळते. गाईच्या व्यवस्थापनाचा रोजचा सरासरी खर्च ७० रुपये आहे. चारा घरचाच आहे. येत्या काळात दुधाच्या बरोबरीने तुपाचीही विक्री होत आहे. असे उपयोगी अनुभव या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ऐकता येतील.

या कार्यक्रमाला शेतकऱयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि ‘अल्प खर्चात फायद्याच्या शेतीचा मूलमंत्र’ घ्यावा, असे आवाहन जनकल्याण समितीचे कार्यवाह मदन भंदुरे, सहकार्यवाह भीमराव गारे, श्रीमती योगिनी चंद्रात्रे, नरहरी जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी भीमराव गारे यांचेशी 95275 63354 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

*