जिल्हा नियोजन समितीची निवड प्रक्रिया रखडणार

0

नाशिक । दि. 27 प्रतिनिधी – जिल्हा नियोजन समिती गठित करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रक्रियाही सुरू केली आहे.

या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी काम पाहतात. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही अपर जिल्हाधिकार्‍यांची बढतीवर बदली झाल्याने सध्या हे पद रिक्त आहे. त्यामुळे आता शासनाकडून नवीन अधिकारी येईपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याने नियोजन समितीवरील निवड रखडण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होउनही पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. तसेच जिल्हा नियोजन समितीचा 900 कोटींच्या आराखड्यालाही नुकतीच मंजूरी देण्यात आली. परंतु अद्याप जिल्हा नियोजन समितीची निवड प्रक्रिया पार पडलेली नाही. त्यामुळे निवडीबाबत शासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने याबाबत प्रतीक्षा लागून होती. मात्र आता शासनाने निवडीबाबत आदेश दिले आहेत.

त्याचे अधिकृत पत्रही जिल्हा नियोजन विभागास दिले आहे. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यानुसार 1 ते 10 ऑगस्टदरम्यान इच्छुकांचे अर्ज मागवणे, 18 ऑगस्ट रोजी छाननी प्रक्रिया, 6 सप्टेंबर रोजी मतदान आणि 7 सप्टेंबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम प्रशासनाने तयार केला आहे. नाशिक जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे 40 सदस्य या समितीवर निवडून जाणार आहेत.

यात जिल्हा परिषदेचे 23, महापालिकेचे 12, नगरपरिषदेेचे 3, नगरपंचायतीचे 2 सदस्य यावर निवडून जातील. या निवडणुकीकरिता अपर जिल्हाधिकारी वर्गाच्या अधिकार्‍यांकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली जाते. मात्र नाशिकचे अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे आणि मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बढतीवर बदली झाल्याने सध्या हे पद रिक्त आहे.

प्रभारी म्हणून दिलीप स्वामी यांच्याकडे नाशिकचा पदभार सोपवण्यात आला आहे. स्वामी यांच्याकडे मालेगावचाही पदभार आहे. मात्र आता त्यांची बदली झाल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाल्याने निवड प्रक्रिया राबवायची कशी, असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर पडला आहे. त्यामुळे आता नवीन अधिकार्‍यांच्या नियुक्तीची प्रशासनाला प्रतीक्षा असून ही प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*