सीसीटीव्हीत दिसूनही चोरटे सापडेनात

0

नाशिक । दि. 23 प्रतिनिधी
नवीन नाशिक परिसरात भरदिवसा धाडसी घरफोडी करून तब्बल 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणार्‍या संशयितांची माहिती देणार्‍या नागरिकास 10 हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे.

घरफोडी करणार्‍या संशयिताचे छायाचित्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही घटना 28 मे रोजी नवीन नाशिकच्या परिसरातील अश्विननगर येथील बंगल्यात घडली होती. या प्रकरणी विकास मोहन शेट्टी (रा. अश्विननगर) यांनी तक्रार दिली आहे.

शेट्टी कुटुंबीय नातेवाईकांना भेटण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे गेले असता चोरट्यांनी संधी साधली होती. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून 40 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे, हिर्‍यांचे दागिने असा सुमारे नऊ लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.

ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. संशयितांनी दरवाजाशी छेडछाड सुरू करताच सीसीटीव्ही कॅमेर्‍याने संशयितांचे फोटो घेतले आहेत.

चोरट्यांनी भरदुपारी घरात प्रवेश केला. तसेच 20 ते 30 मिनिटात सर्व मुद्देमाल घेऊन धूम ठोकली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे चोरट्यांचे छायाचित्र पोलिसांच्या हाती लागले.

मात्र, अद्याप या चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही. सदर फोटो राज्यासह देशभरातील पोलिसांना पाठवण्यात आले आहे. मात्र, तरीही अद्याप चोरट्यांचा काहीच मागमूस लागलेला नाही.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी संशयित आरोपींची माहिती देणार्‍यास 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. संशयिताची माहिती देणार्‍यांची नावे गुप्त ठेवली जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*