महिला रुग्णालय भाभानगरलाच

विरोध झाल्यास महिलाशक्ती एकवटणार - आ. प्रा. फरांदेचा इशारा

0

नाशिक । दि. 4 प्रतिनिधी
भाभानगर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या महिला रुग्णालयप्रश्नी राजकारण न करता सर्वांनी एकत्रितपणे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

गेल्या चार वर्षांपासून राजकीय इच्छाशक्तीअभावी सदर रुग्णालय प्रलंबित राहिले आहे. हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.

टाकळीरोडवरील जागा या रुग्णालयासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचा खुलासा करत आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी महिला रुग्णालय भाभानगरलाच होणार असे स्पष्टीकरण दिले. मात्र तरीही या रुग्णालयाला विरोध झाल्यास महिला शक्ती दाखवून देवू, असा इशाराच फरांदे यांनी दिला.

शासनाच्या योजनेतून भाभानगर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून सध्या आमदार देवयानी फरांदे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गीते यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. गीते यांनी या रुग्णालयाला प्रखर विरोध दर्शवला आहे.

या प्रश्नी आ. फरांदे यांनी आज आपले मोैन सोडत कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय भाभानगरलाच होणार अशी भूमिका मांडली. याबाबत काही ठोस कारणेही त्यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर मांडली. गेल्या चार वर्षांपासून रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. यासाठी निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर देवूनही चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी हे रुग्णालय प्रलंबित राहिल्याचे त्यांनी सांगितले.

बिटको रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे होत असलेल्या गर्दीमुळे सामान्य कुटुंबातील महिलांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. नुकतीच सिव्हील रुग्णालयात इन्क्यिुबेटरअभावी झालेली घटना, मायको रुग्णालयाजवळील रिक्षात झालेली प्रसूती या घटनांचा विचार करता महिलांसाठीचे रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ज्यामुळे महिलांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार आहे व नवजात शिशुंसाठी स्वतंत्र कक्षही असणार आहे. तसेच शासनाच्या सर्व आरोग्य सेवांचा लाभ या रुग्णालयाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी महिलांना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही जागा शहराच्या मध्यवस्तीत येत असून दळणवळणाच्या दृष्टीने सर्वांना हे सोयीचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याठिकाणी शवगृह अथवा पोस्टमार्टेमसारखी सुविधा राहणार नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

टाकळीची जागा अयोग्य
ज्या टाकळीच्या जागेवर रुग्णालय उभारण्याचे सांगितले जात आहे. मुळात ती जागा तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे फरांदे यांनी सांगितले. टाकळीतील जागेपैकी 2720 चौ.मी जागा तीव्र उताराची आहे. तेथे बांधकाम होऊ शकत नाही. ही जागा वापरात आणण्यासाठी 305 मी. लांबीची संरक्षक भिंत बांधावी लागेल.

यासाठी 25 कोटी रुपये खर्च येईल. उर्वरित 10980 चौ.मी. जागेत 159 झाडे आहेत. यातील 54 झाडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुनर्रोपित केली आहे. उर्वरित 1920 चौ.मी जागा ही बांधकामासाठी उपलब्ध होत असून ही जागा विखुरलेल्या स्वरुपात आहे. वास्तुविशारदांच्या मते झाडे काढल्याशिवाय रुग्णालय होऊ शकत नाही.

नियमानुसार रुग्णालयासाठी 12 मी. रूंदीचा पोहोच रस्ता लागतो. मात्र जागेवर प्रत्यक्षात 3 मी. रस्तांच उपलब्ध होतो. त्यामुळे 12 मी. रस्ता उपलब्ध होण्यासाठी 370 चौ.मी. जागा भूसंपादन करावी लागेल. त्यासाठी एक कोटी इतका खर्च आहे.

रुग्णालयाला हवी 8 हजार चौ.मी जागा
प्रस्तावित महिला रुग्णालयासाठी किमान 8 हजार चौ.मी. जागा आवश्यक आहे. 25 कोटी रुपये खर्च करून चार मजली रुग्णालय बांधण्यात येणार आहे. भाभानगर येथे सुमारे 9 हजार 600 चौमी आणि पार्किंगची अतिरिक्त 500 चौ.मी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचा भूसंपादनाचा खर्चही वाचणार आहे. शिवाय हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सर्वांनाच ते सोयीचे ठरणार असल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*