नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी

0

नाशिक । दि. 27 प्रतिनिधी
मान्सूनपूर्व आणि मान्सूनने जिल्ह्यात हजेरी लावल्यानंतर दडी मारली. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकतो की काय अशी शक्यता व्यक्त होत असताना दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने धरणसाठ्यातही वाढ होण्यास मदत झाली आहे.

यंदा 15 पैकी 9 तालुक्यांमध्ये पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे मालेगाव, नांदगाव, सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यांमध्येही वरुणराजाने कृपा केल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. कधी पाऊस तर कधी उघडीप असा अनुभव जिल्हावासी घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.

जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 2 हजार 324 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा 26 जूनपर्यंतच जिल्ह्यात 2 हजार 741 मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा 417 मिलीमीटर पाऊस अधिक पडला आहे.

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यात जून महिन्यात सरासरी 465 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र आतापर्यंत 479 मि.मी. पाऊस पडला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी 260 मि.मी. पाऊस पडतो. परंतु तालुक्यात 86 मि.मी. अधिक म्हणजेच 346 मि.मी. पाऊस पडला आहे.

सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तालुक्यात जून महिन्यात 93.50 मिलीमीटर पाऊस पडतो. परंतु यंदा आतापर्यंत 253 मि.मी. पाऊस पडला आहे. म्हणेजच सर्वाधिक 159 मि.मी. पाऊस अधिक पडला आहे.

मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण, सुरगाणा यांसह सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यावरही पाऊस मेहेरबान झाला आहे. या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असून शेतकरी सुखावला आहे.

जिल्ह्यात 15 पैकी 9 तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी अजूनही सहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

येवला, निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी आणि पेठ या तालुक्यांमध्ये अद्याप जून महिन्याच्या सरासरीएवढा पाऊस होऊ शकलेला नाही. येवल्यात जून महिन्यात 120 मि.मी. पाऊस पडतो. परंतु यंदा आतापर्यंत अवघा 74 मि.मी. पाऊस पडला आहे.

LEAVE A REPLY

*