मराठा मोर्चावरून परतणाऱ्या युवकांवर येवल्याजवळ काळाचा घाला

0

येवला दि १० प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चावरून घरी परत येत असताना झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औरंगाबाद परिसरातील ४ जणांचा मृत्‍यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांना येवला येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तर जखमींना प्रथम वैजापूर येथे नेण्यात आले व तेथून अधिक उपचारार्थ औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारायण कृष्‍णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे आणि गौरव प्रजापती (वय, २३, रा. बजाज नगर, जि. औरंगाबाद) अशी ठार झालेल्‍या चौघांची नावे आहेत.

तर, उमेश भोपाल भगत असे जखमीचे नाव आहे. जखमींना उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले असल्याचे समजते.

येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद मार्गावर खामगाव पाटी शिवारात ट्रक(क्र. एम. एच. १८ एम ३११४), व्हर्ना कार (क्र. एम. एच. २०, इ एफ. ७२६४) आणि मारुती कार (क्र. एम. एच. १५, बी. डब्‍लू) यांचा सकाळी ६.३० च्या सुमारास तिहेरी अपघात झाला.

यात हर्षल, नारायण आणि अविनाश यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर, उमेश भगत गंभीर जखमी झाला आहे. अपघातात व्हर्ना कारचा चक्काचूर झाला असून, ट्रकचे पुढचे टायरही निखळून गेले आहे. व्हर्ना कारमधील तरूण मुंबई येथील मराठा मोर्चावरून औरंगाबाद येथील वाळुंज येथे घरी परतत होते.

अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा बँकेचे माजी व्हा चेअरमन ऍड माणिकराव शिंदे, नगरसेवक प्रवीण बनकर, ऍड शाहू शिंदे, छावाचे संजय सोमासे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पो. हवालदार खैरे अधिक तपास  करीत आहे.

LEAVE A REPLY

*