Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांना नोटीसा; १८ ला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Share

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल असलेल्या शिवसैनिकांना १८ सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सूर आहे. २०१६ साली महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या वक्तव्याच्या निषेध करत नाशिकमधील काही शिवसैनिकांनी मेळावा उधळून लावला होता. याप्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयात हजर राहण्याचे  आदेश दिल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडय़ाबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रम उधळून लावला होता.

याप्रकरणी भाजप आमदारांच्या मागणीमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह नऊ जणांवर कारवाई केली होती.

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख आ. अजय चौधरी यांनी नाशिकरोड कारागृहात जाऊन शिवसैनिकांची भेट घेतली होती.

गृहमंत्री व पालकमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून भाजपच्या कुटील कारस्थानास शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा त्यावेळी शिंदे यांनी दिला होता. तर संपर्क नेते अजय चौधरी यांनी भाजपवर अतिशय जहरी भाषेत टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना युती तुटण्याबाबत तर्क वितर्क लढवले जात असल्यामुळे जुने प्रकरणे उकरून काढण्याचा प्रयत्न मित्रपक्ष भाजपकडून होत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!