Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाद हा पंढरीचा…नाद हा वारीचा…नाद हा अभंगाचा

Share

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी

सुखी संसाराची सोडुनिया गाठ… पावले चालती पंढरीची वाट… या पंक्तीच्या आठवणीला उजाळा देत वर्षानुर्षांची परंपरा असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज दिंडीसह रजतरथ आज सातपूर येथून आषाढवारीसाठी पंढरीकडे मार्गस्थ झाला. दुसरा मुक्काम आज गोदातीरावर असून दुपारच्या जेवणानंतर वारकरी गोदातीरी पोहोचतील अशी शक्यता आहे. 

जणू स्वर्गीय सुखानुभूतीचा प्रत्यय आणून देणारा हा सोहळा वारकर्‍यांसाठी संस्मरणीय ठरणारा आहे. टाळ-मृदुंगाचा गजर, सुमधूर भजन अन् अभंगात दंग झालेले सुमारे दहा हजारांवर महिला-पुरुष वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी मजल-दरमजल करीत निघाले अन् वाटेत पावसाचे आगमन झाल्याने सगळेच मनोमन सुखावले.

कीर्तनकार, विणेकरी, भालदार, चोपदार आदींचा पालखीत समावेश आहे. दिंडीच्या औचित्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरनगरी सजली, फुलल्याचे विलोभनीय दृश्य दिसले.

दिंडीचा प्रवास म्हणजे सन्मार्ग, शाश्वत सुखानुभूती अन् आनंदाचा प्रवास आहे. ङ्गदेवा आता पाऊस बरसू दे,फ अशी वारकर्‍यांची आर्त आळवणी यावेळी मनोमन सुरू असल्याचे चित्र दिसले. काही नागरिकांनी पालखीसोबत नाक्यापर्यंत येत निवृत्तीराय व लाडक्या पांडुरंगाचे येथूनच मनोभावे दर्शन घेत पालखीला प्रेमभावे निरोप दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून सचिव श्रीकांत भारती यावेळी उपस्थित होते. संत निवृत्तीनाथ मंदिरात विधिवत रजत रथाची महापूजा करण्यात आली.

पालखीचे तीर्थराज कुशावर्तावर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष व सहकार्‍यांनी स्वागत केले. तीर्थात नाथांच्या पादुका व मूर्तीला अभिषेक, स्नान घालण्यात आले.


मंदिर पुजारी गोसावी बंधू यांनी पूजा पौरोहित्य केले. विश्वस्त जयंत महाराज गोसावी, पंडित महाराज कोल्हे, पुंडलिक थेटे आदी पदाधिकार्‍यांसह नगराध्यक्ष या पूजेत सहभागी झाले.

माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी रथाला जोडण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या पताकाधारी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशा विलोभनीय दृश्यात भागवत धर्माचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याची अनुभूती ‘याचि देही याचि डोळा’ प्रत्ययास आली.

वारीचा पहिला मुक्काम सातपूर येथे  पार पडल्यानंतर वारकरी गंगेच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे नाशिक शहर दुमदुमून निघाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!