Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिककरांसाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिककरांसाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

परदेश परराज्य व परजिल्ह्यातून आलेल्यांची माहिती प्रशासनास कळवावी

नाशिक | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत; त्यामुळे सर्वांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे मालेगावमध्ये असलेल्या दाट लोकवस्तीमुळे या रोगाचा प्रसार होण्याचे संभाव्य प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी परदेश, परराज्य अथवा पर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ प्रशासनास देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 28 मार्च रोजी पहिला करोना बाधित रुग्ण आढळून आला त्यानंतर आजपर्यंत ती संख्या 13 वर गेली आहे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहून घरातच थांबणे गरजेचे आहे. यासाठी जीवनावश्यक किंवा अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यावर गर्दी करणे, विनाकारण लॉकडाऊन कालावधीत फिरणे या गोष्टी टाळाव्यात.

या विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्याकडे उशिराने झाल्यामुळे अजून देखील सर्व परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासर्व यंत्रणा अतिशय उत्कृष्टपणे उपायोजना करून आपली जबाबदारी पार पाडीत आहेत.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. त्याचप्रमाणे विशेष करून मालेगावमध्ये पावरलूमचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांची फुप्फुसांची क्षमता कमी आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी टीबीचे पेशंट जास्त आहेत, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगची सर्व नियम पाळणे अत्यावश्यक आहे.

जे कोणी संचारबंदी कालावधीत नियमांचा भंग करेल त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे या सर्व परिस्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या