Type to search

नाशिक

चिमुकल्यांची देखणी दिंडी, देई पर्यावरण रक्षणाची दवंडी

Share
नाशिक | प्रतिनिधी 
विठुराया अन् आषाढीचे महत्त्व चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने शुक्रवारी (दि. ११) गौरी सामाजिक कल्याणकारी संस्था संचालित न्यू ग्रेस अकॅडमीत आषाढी एकादशी निमिताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करत पर्यावरण संरक्षणाचा जागर करत साजरी करण्यात आली. मराठी मुलुखात साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या अभंगानुसार विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.
सकाळच्या परिपाठात आषाढी एकादशीचे महत्त्व व कथा सौ. वैशाली पाटील यांनी सादर केली. शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. न्यू ग्रेस नगरीत जणू साक्षात अलंकापुरी अर्थात, पंढरपूर अवतीर्ण झाले होते.
विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ-चिपळ्या घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली… यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली. सोबतच वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या सोहळ्याची पसायदानाने सांगता करण्यात आली.
शाळेतील आवारासोबतच बोरगड, ओमकार कॉर्नर, आर.टी.ओ ऑफिस या परिसरातून दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या.
विविध प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक घेऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत वृक्षदिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले. ७वीच्या विद्यार्थ्यानी ठिकठिकाणी लेझीमचे प्रात्याक्षिक पूनम काकड व नीलिमा गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री सुरावकर व मुख्याध्यापिका परवीन शेख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!