Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भाजपने खेचून आणली ‘पश्चिम’ची जागा; पंचरंगी नव्हे ही तर हिरे विरुद्ध हिरे लढत

Share

सातपूर । प्रतिनिधी

महायुतीअंतर्गत बंडाळी, पक्षांतर्गत इच्छुकांची नाराजी यामुळे निर्माण झालेले अस्थिरतेचे वातावरण व ‘धनशक्ती’चे आव्हान लक्षात घेता अतिशय शिस्तबद्ध व प्रामाणिक प्रचार करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी ताकदीने नाशिक पश्चिमची जागा खेचून आणली.

शहरात नव्हे तर राज्यात प्रतिष्ठेची ठरलेली नाशिक पश्चिमची लढत ही भाजपच्या सीमा हिरे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे, निवडणूक लक्षात घेऊन भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले अपूर्व हिरे, सेनेतून बंडखोरी करून मनसेनेच्या तिकिटावर उतरलेले दिलीप दातीर यांच्या गुरफट्यात सीमा हिरेंना निवडणूक लढवायची होती.

इच्छुकांच्या बैठकीत सर्वाधिक मुलाखत देणारे पुढे आल्याने ते विरोधात काम करतील, अशी काहीशी भावना सुरुवातीला होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या योग्य तंबीमुळे व नियोजनबद्ध प्रचारातून सीमा हिरे विजयी झाल्या.

प्रत्यक्षात मागील दोन वर्षांपासून अपूर्व हिरे यांनी परिसर पिंजून काढला होता. या परिसरात त्यांच्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घराघरांत प्रचार केला गेला होता. डॉ. कराड यांच्या उमेदवारीने कामगारवर्गाची मते सीमा हिरेंच्या वाट्यातून कमी होण्याचा व विलास शिंदेंच्या बंडखोरीने शक्ती कमी होण्याचा फायदा मिळेल, असा विश्वास अपूर्व हिरे यांना होता. मात्र प्रत्यक्षात मतदारांनी सीमा हिरे यांच्या पारड्यात मतदान टाकत या सर्व शक्यतांना पूर्णविराम देत बंडखोरांसोबतच धनशक्तीलाही चपराक दिली.

विलास शिंदे यांच्यासोबत सेनेचे 22 नगरसेवक काम करणार होते. त्यांनी तसा विश्वास दिल्यानेच विलास शिंदे निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रत्यक्षात शिवसेनेच्या नगरसेवकांनी ताकदच लावलेली दिसून आली नाही.

विलास शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातून पहिल्या दोन फेर्‍यांतच अंदाज आला. पहिल्या फेरीतील 90 मतांची आघाडी दुसर्‍या फेरीत पिछाडीवर गेली. पुढे ती वाढतच गेली.

प्रत्यक्षात पंचरंगी वाटणारी ही निवडणूक पहिल्या दोन फेर्‍यांनंतर सीमा हिरे व अपूर्व हिरे यांच्यातील सरळ लढत वाटत होती. शेवटच्या टप्प्यात तर इतर उमेदवार मतदानाच्या गतीत दूरदूरपर्यंत दिसून आले नाहीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!