नांदगाव : आमदार कांदेंची गांधीगिरी; तहसीलमधील लेटलतिफांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, नायब तहसीलदारांनाही झाला उशीर

नांदगाव : आमदार कांदेंची गांधीगिरी; तहसीलमधील लेटलतिफांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, नायब तहसीलदारांनाही झाला उशीर

नांदगाव | प्रतिनिधी 

सरकारी अधिकारी वेळेवर आपल्या कार्यालयात दाखल होत नाहीत अशी मतदारसंघातील अनेक नागरिकांची तक्रार होती. दरम्यान, आज आमदार सुहास कांदे यांनी तहसील आणि पंचायत समितीतील लेटलतिफांना धडा शिकविण्यासाठी गांधीगिरी आंदोलन केले.  अधिकाऱ्यांच्या येण्याच्या वेळीच आमदारांसह अनेक पदाधिकारी तहसीलमध्ये दाखल झाले होते. बोटावर मोजण्याइतक्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी दिसून आले होते.

त्यानंतर बऱ्याच कालावधी उलटून गेल्यानंतर एक-एक अधिकारी यायला सुरुवात झाली. नांदगांव तहसील कार्यालयातील व पंचायत समिती कार्यालयातील उशिरा येणार्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आमदार सुहास कांदे यांनी चे टोपी उपरणे व गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचा सत्कार केला.

नांदगांव नवीन तहसील कार्यालयातील तसेच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेहमीच उशिरा येऊन लवकर निघून जातात अशी तक्रार स्थानिकांकडून केली जात होती.

ग्रामीण भागातील जनतेला शासकीय कामासाठी या कार्यालयांमध्ये वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे आमदार सुहास कांदे यांनी उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना टोपी उपरणे, गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पध्दतीने सत्कार करून आपल्या वेळेची जाणीव करवून दिली.

यावेळी नायब तहसीलदार पी. जे. पाटील, शिक्षण विभागातील समाधान पवार आणि कुरेशी, पाणीपुरवठा शाखा अभियंता  एम एच पाटील, पशुसंवर्धन विभाग नाना अहिरे, शाखा अभियंता लघु पाटबंधारे (जि प) ए. व्ही. पवार आदींचा समावेश होता. यावेळी आमदारांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून जनतेचे प्रश्न मार्गी काढावेत अशी तंबीच या अधिकाऱ्यांना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com