Photo Gallery : शिंदे टोलनाक्यावर गॅस टॅकरमधून गळती; वाहतूक ठप्प

0
रवींद्र केडिया | औद्योगिक क्षेत्रात नेहमीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षमपणे राबवणे शक्य असते. मात्र रस्त्यावरील वाहतुकीच्या क्षेत्रात अचानक उद्भवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज होणार्‍या यंत्रणांची सक्षमता तपासण्यासाठी अशा ‘मॉकड्रिल’चा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे यांनी केले.

जागतिक आपत्ती निवारण सप्ताहांतर्गत 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शिंदे पळसेजवळील टोलनाका परिसरात गॅस टँकरमधून वायू गळती विषयावर मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईहून सिन्नरला जाणार्‍या एचपीसीएल गॅस टँकरमधून शिंदे पळसे टोलनाक्यावर गॅस गळती होत असल्याचे क्लिनरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ट्रक टोलनाक्याच्या मोकळ्या मैदानाजवळ उभा केला. यासोबतच तातडीने हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. कंपनीत सूचना देत मदतीची मागणी केली.

यादरम्यान अग्निशमन, पोलीस, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाला सूचना देण्यात आल्या. सकाळी 11.30 ला सुरू झालेल्या या घटनेनंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटात यंत्रणा जागेवर पोहोचल्या. कंपनीचे मुख्य प्लांट मॅनेजर निकुंजकुमार शुक्ल, सुरक्षा व्यवस्थापक अखिल पचौरी यांनी तातडीने मदतकार्याची आखणी केली. यात कंपनीचे मयंक शर्मा व आशिष अग्रवाल यांनी सहभाग घेतला होता. तातडीने अग्निशमन पथकाने गळतीच्या जागी पाणी मारण्यास सुरुवात केली. विशेषज्ञांच्या माध्यमातून गॅस गळतीच्या जागी दुरुस्ती करण्यात आली.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाच्या कर्मचार्‍यांनी टोलनाक्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, धावपळीत एक कर्मचारी जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर त्याच्या पायाला मुकामार लागल्याने घरी सोडण्यात आले.

या उपक्रमात जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, तहसीलदार अरुण शेवाळे, आरटीओ विभागाचे धनंजय गोसावी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक व्ही.के.खिरोडकर, के.टी.झोपे, एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी पी.आर. घोलप, विलास बिडवे, बाविस्कर, मार्गचे अध्यक्ष नॉर्बट डिसूझा आदी उपस्थित होते.

या मॉकड्रिलचे परीक्षण बॉश कंपनीचे बी.आय. शर्मा, नाशिक प्लांटचे महाव्यवस्थापक नॉर्बट डिसूझा, सुरक्षा अधिकारी सचिन मोरे, महिंद्र इगतपुरीचे मनोज पाटील, एकलहरा पॉवर स्टेशनचे दंडवते, जिंदाल पॉलीचे कर्पे, चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

*