Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

Share
जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच : छगन भुजबळ; Zilla Parishad also leads the Mahavikas Aaghadi - Chhagan Bhujbal

नाशिक | प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

दादर येथील शिवाजी पार्क मैदानात हा दिमाखदार सोहळा पार पडला.  या सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखो शिवसैनिकांचा मेळा जमला होता.


आजच्या या दिमाखदार सोहळ्यात एकूण 6 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी शपथ घेतली.

छगन भुजबळ यांचा जीवनप्रवास

मंत्रभूमी बरोबरच यंत्रभूमी आणि अगदी अलीकडच्या काळात तंत्रभूमी म्हणून नाशिक नगरीची ओळख निर्माण झाली आहे.परंतु खऱ्या अर्थाने मंत्रभूमी म्हणून प्रभू रामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या नगरीत १५ ऑक्टोबर १९४७ रोजी माझा जन्म नाशिक येथे झाला.मुळातच आईचे माहेर असल्याने नाशिकच्या मातीशी माझा जवळून सबंध आला आहे, नव्हेतर या मातीने माझ्यावर आईसारखी माया केली आहे.

म्हणूनच की काय आईच्या निधनानंतरही या नाशिकच्या मातीने मातेची उणीव भासू दिली नाही. दिवाळीच्या, उन्हाळाच्या सुट्टीत मामाच्या घरी आल्यानंतर कमोद गल्लीतील सवंगडयांसोबत बालपणातील खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद मला उपभोगता आला. आजही हे मित्र समोर येताच या गोड आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहात नाही.

पुढे आईच्या मावशीने सांभाळ करण्यासाठी मला माझगांवला नेले. या आजीने मात्र,मोठ्या चिकाटीने माझे शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला प्रसंगी तिला कितीही कष्ट करावे लागेल तरी तिने कुठेही तडजोड केली नाही. त्यामुळे आज मी जो काही आहे ते केवळ त्या आजीमुळे. त्यानंतर गुणवत्तेमुळेच मुंबईतील व्हीजेटीआय या नामांकीत संस्थेच्या मॅकेनिकल इंजिनियरींग पदविकेसाठी मोफत प्रवेश मिळाला याचे श्रेय माझ्या अशिक्षित व ध्येयवेड्या आजीलाच द्यावे लागेल. विशेष म्हणजे या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर  विश्वस्थ म्हणून काम करण्याची संधी आज मला मिळाली. हे मी माझे भाग्याच समजतो.

आपला जन्म कोणत्या धर्मात कोणत्या जातीत, कुणाच्या परिवारात व्हावा हे आपल्या हातात नाही. कदाचित असे स्वातंत्र मिळाले असते तर व्यवहारातील मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष, क्रांती हे शब्द हद्दपार झाले असते. म्हणूनच आजही कर्तुत्वाला सलाम केला जातो. दृष्टीची किमत आंधळ्याशिवाय, ज्ञानची महती निरक्षराशिवाय इतर कुणीही सांगू शकत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे असे म्हटले जाते. सुमारे ६५ वर्षापूर्वी भविष्याचा वेध घेत मला हे वाघिणीचे दुध पाजले त्या निरक्षर आजीला सप्रेम प्रणाम.

पुढे एका ख्यातनाम कंपनीमध्ये नोकरी मिळाली. कंपनी म्हणजे ‘कामगार आणि मालक रथाची दोन चाके’ माझ्यावर केलेले सामाजिक कार्याचे संस्कार गप्प बसू देत नव्हते त्यातूनच पुढे कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. लोकशाही राज्य व्यवस्थेत लोकशाहीमुळे समाजाला गरीबातील गरीब आणि उपेक्षित घरातील कोणत्याही व्यक्तीला सत्तेत आणि शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कवाडं खुली करून दिली. राज्य आणि देशपातळीवर अनेक गरीब उपेक्षितांनी या खुल्या कवडातून सत्तेच्या वर्तुळात प्रवेश केलाय ते सत्ताधारी झाले.
याच परंपरेला अनुसरून एका गरीब कुटुंबातील माझ्यातला ‘मराठी तरुण’ जनतेच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलो. बाळासाहेब ठाकरे यांच्या धारदार वाणीने प्रभावित होऊन शिवसैनिक झालो. बाळासाहेबांचे शब्द आज्ञा मानून काम करायचं आणि जे काही करायचं ते अगदी प्रमाणिकपणे अंग झोकून. हाच माझा स्थायीभाव असल्याने इथपर्यंत पोहचू शकलो.

पुढे माझ्यातील नेतृत्वगुण ओळखून बाळासाहेबांनी माझगाव शाखेच्या शाखाप्रमुखाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. सामाजिक कार्यामुळेच सन १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झालो. १९७३ ते १९८४ पर्यंत मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते पद सांभाळले. या कालवधीत सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्याची एकही संधी न दवडल्याने शिवसेना पक्षाला १९८५ मुंबई महापालिकेवर विजय मिळल्याने मुंबई महानगरीचा महापौर होण्याचे भाग्य मला लाभले.

महापौर म्हणून काम करीत असतांना ‘स्वच्छ मुंबई- सुंदर मुंबई’ नारा मी दिला. त्याचप्रमाणे गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा,शहराचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या कडेला व रस्त्याच्या मध्ये दुभाजक म्हणून लावलेल्या कठड्यांचे सौंदर्यीकरण यासारखे नागरी सुधारणा कार्यक्रम तळमळीने राबविण्याचा मी प्रयत्न केला. १९९१ मध्येही पुन्हा शिवसेना सत्तेत आल्याने पुन्हा एकदा महापौर होण्याचा बहुमान मला मिळाला.

शिवसेनेच्या एकूणच जडणघडणीत विशेषतः शिवसेनेला ग्रामीण भागात व उपेक्षित वर्गापर्यंत पोहचविण्याकामी मी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केल्याशिवाय शिवसेनेचा इतिहास लिहिलाच जावू शकत नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात वेश बदलून व नाव बदलून पत्रकार बनून कडेकोट बंदोबस्तात गोव्यामार्गे बेळगावात प्रवेश केला आणि आंदोलन यशस्वी केले.

तसा खरेतर हा प्रसंग जीवावर बेतणारा होता परंतु काम कोणतेही असो त्या भूमिकेशी एकरूप होत प्रमाणिकपणे झोकून देण्याचा माझा स्थायीभाव असल्यानेच माझ्या सारखा उपेक्षित गरीब कुटुंबातील तरुण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचू शकला.

बाळासाहेब ठाकरे यांचा निधड्या छातीचा एक आवडता शिलेदार म्हणून माझी महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली. एक प्रमाणिक सैनिक म्हणून माझं सेनेत स्थान निर्माण झालं. पुढील काळात विधानसभेच्या निवडणुकीत माझगांव विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झालो.

अंगी क्षमता, योग्यता आणि धमक असूनही हेतुपुरस्कर डावलण्यात येवू लागले ज्या संघटनेसाठी रक्ताचं पाणी करून कष्ट उपसले त्याच संघटनेत उपेक्षा होऊ लागली विरोधी पक्षनेते पदावरून त्यावर शिक्कामोर्तब झाले. तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली.

मंडल आयोगाच्या शिफारसींचे स्वागत केल्यामुळे सेनेत सापत्निक वागणूक मिळू लागल्याने सेना सोडण्याचा अप्रिय आणि वेदनादायक निर्णय घ्यावा लागला. आणि येथूनच जीवनातील संघर्षाची सुरुवात झाली. मला माझी गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबरच मागासवर्गीयांचं कल्याण करावयाचं असेल तर या सर्व अग्नीपरीक्षांमधून मला जावेच लागणार होते ही खुणगाठ मनाशी बांधून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांची आणि होणाऱ्या विरोधाची मी कधीच तमा बाळगली नाही.

वाघाच्या गुहेत जाणाऱ्यांची पावलं दिसतात परंतु गुहेतून बाहेर येणाऱ्यांची पावलं दिसत नाही असं म्हटलं जात. शिवसेना सोडण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी शिवसेना मोठ्या जोश्यात होती. थोडक्यात शिवसेना म्हणजे वाघाची गुहा होती. शिवसेनेत येणाऱ्याला आणि मोठ होणा-याला मुभा होती परंतु बाहेर पडणाऱ्यांची खैर नव्हती. तरीही दिनदलित, बहुजन इतर मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी १६ आमदारांसह शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत बहुजनांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षांतरानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. दरम्यानच्या काळात सन १९९१ मध्ये महसूल खात्या नंतर गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा या खात्यांचे मंत्री म्हणून काम पहिले.

आर्थिक सामाजिक समता प्रस्थापित करावयाची असेल तर केवळ सत्ता असून चालणार नाही,  तर सामाजिक क्रांतीची चळवळ उभी करावी लागेल याची जाणीव झाली. त्याचा परिपाक म्हणून ज्येष्ठ समाजसुधारक पांडुरंग गायकवाड, विचारवंत हरि नरके याच्या मार्गदर्शनातून महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशभरातील ओबीसींच्या उद्धाराची दारे खुली झाली असे म्हणता येईल. याच संघटनेची व्याप्ती वाढवून पुढे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असे नामकरण करण्यात आले.

या देशव्यापी संघटनेच्या माध्यमातून बिहार, राजस्थान, झारखंड, दिल्लीसह दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंतच्या अनेक राज्यांतील करोडो ओबीसी बांधवांच्या समता रॅलीद्वारे झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे केंद्र शासनाबरोबरच त्या-त्या राज्यातील शासनकर्त्यांना ओबीसींचे न्याय हक्क प्रदान करण्यास भाग पडले.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील, नोकरीतील आरक्षण, शिष्यवृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण पुणे विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नामकरण तसेच पुणे येथील फुले वाड्याचे तसेच सावित्रीबाईंच्या जन्मभूमीचे राष्ट्रीय संपत्ती म्हणून लोकार्पण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे पुणे विद्यापीठातील पुतळ्यांचे अनावरण हे महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्याचे प्रमुख यश आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट झाल्यानंतर त्यांना महात्मा जोतीबा फुले यांच्या समतेच्या विचारांची एक भेट म्हणून ‘गुलामगिरी’ हे त्यांचे पुस्तक त्यांना भेट म्हणून देण्याचा योग आल्याने  समतेचे विचार सातासमुद्रापलीकडे पोहचविता आले.

सत्तांतरानंतर १९९६ मध्ये विधानपरिषदेवर निवड झाल्याने विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून युती शासनाला सळो की पळो करून सोडले. त्याचा परिणाम म्हणून १९९९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आघाडी सरकारचे पर्व सुरु झाले. या सरकार मध्ये स्व.विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री पदी तर मला उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी गृह व पर्यटन खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती.

गृहमंत्रीपद मिळाले त्या कालवधीत खंडणीखोर गँगवार आणि प्रसंगी होणाऱ्या एन्काऊंटर्सनी लोक भयभीत झाले होते. हॉटेल मालक, व्यापारी, उद्योजक, सिने कलावंत त्रासून गेले होते. राकेश रोशन यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा अस्वस्थ सिने उद्योगाने मुंबईतून हैद्राबादला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबईतला हा मोठा उद्योग इथेच रहायला हवा म्हणून स्वतः पुढाकार घेतला आणि दोन महिन्यात परिस्थिती सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांना दिले. मेंडोसा, एम.एन.सिंग आणि त्यानंतर शिवानंदन या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वास आणि मोकळीक दिल्यानंतर त्यांनी बेफाम झालेल्या माफियांना वठणीवर आणले.पोलिसांच्या हाती पुरावा आल्यानंतर हिरे व्यापारी भरत शहा याला मोक्काखाली अटक करण्याची हिम्मतही पोलिसांनी माझ्या काळात दाखविली होती. त्याचबरोबर संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मीच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आपल्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाची कल्पना मांडली होती. त्याला एन.चंद्राबाबू नायडू आणि फारूक अब्दुला यांनी उचलून धरलं होत.

त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली होती. त्यातूनच जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टीम, जिओग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम, बॉम निकामी करण्याची तेव्हा असलेली अत्याधुनिक यंत्रणा खरेदी केली गेली.

याच दरम्यान शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारं बनावट स्टॅम्प विक्रीच तेलगी प्रकरण बाहेर आलं होत. राज्याचा गृहमंत्री म्हणून या प्रकरणाची पाळेमुळं मी खणून काढली मात्र, उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचल्याने सर्व विरोधक स्वकीयांनी मिळून या प्रकरणात मला लक्ष केलं. या प्रकरणाशी माझा तीळमात्र सबंध नसतांना मला या प्रकरणात ओढूनताणून गोवण्याचा प्रयत्न केला गेला. हे प्रकरण सुरु असतांनाच्या दिर्घ कालावधीत कुटुंबीयासह समर्थक कार्यकर्त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

या काळात अन्न पाणी गोड लागत नव्हत की शांतपणे झोपही लागत नव्हती. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं की तेलगीच्या माझ्याशी संबंधीत बातम्या प्रसिद्ध झालेल्या असे. याच काळात माझ्या विरोधातील बातमी दिल्याखेरीज सर्व प्रसिद्धी माध्यमांचा दिवस पूर्ण होत नसे. माझ्या दृष्टीने राजकीय जीवनातील ही सर्वात मोठी संयमाचा कस लावणारी ही अग्निपरिक्षा होती. परंतु अपेक्षेप्रमाणे मोठ्या चौकशीनंतर या प्रकरणातील सत्य बाहेर आले आणि या प्रकरणाशी माझा कवडीमात्र सबंध नसल्याचे निष्पन्न झाले.

माझगाव मधील पराभवानंतर पुन्हा एकदा धोका नको म्हणून पवार साहेबांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मला सूचना केली गेली. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुर्गम अतिमागास तालुक्यातील उपेक्षित जनतेने विकासासाठी येवल्यातून विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मुळातच धाडसी व आव्हाने झेलण्याचा स्वभाव असल्याने मी येवल्याची निवड केली.

मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास हे धेय्य मनाशी बाळगून विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक जिंकली आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. उपेक्षित येवल्याचा गेल्या दहा वर्षात झालेला कायापालट आपणासमोर आहे. येथील पाटपाण्याच्या प्रश्नाबरोबरच रस्ते, पाणी, वीजेचा प्रश्न सोडवून या परिसराला समृद्ध करण्याचे पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेल्याचे समाधान मला लाभते.

शाळा, निर्वासितांना निवारा, निराधारांना आधार, वंचिताना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रमाणिक प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच वाट पाहणाऱ्या गावांना अगदी शुद्धीकरणासह माफक दरात पाणी पाणीपुरवठा करणारी ३८ गांवे पाणी पुरवठा योजना आणि १६ गांवे पाणी पुरवठा योजना कार्यरत असून प्रमाणिक व होतकरू कार्यकत्यांच्या समितीकडे हे नियोजन देण्यात आलेले आहे.

लोकसहभागातून दिर्घ काळापर्यंत चालणाऱ्या या दोन्ही योजना महाराष्ट्रातील एकमेवद्वीतीय  योजना आहे. गेल्या १० वर्षातील संपूर्ण आमदार निधी जलसंधारण कामांसाठी खर्च केल्यामुळे परिसराचा जलस्तर तर उंचावला त्याचबरोर आर्थिक स्तर देखील सुधारल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यासह गावे वाड्या वस्त्या पक्क्या रस्त्यांनी जोडल्या गेल्यामुळे दळणवळ वाढले आहे.

गतिमान दळवळणामुळे जीवनमान सुधारले आणि त्यातून प्रगती झाल्याचे येथे पहावयास मिळते. राजकारण करीत असतांना देशभरात कुठेही असलो तरी येथील मतदारांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडविण्याकामी सुसज्ज असे संपर्क कार्यालय असून त्या माध्यमातून मोठ्या मोठ्या शहरांतील दवाखान्यांतील मदत मिळवून देणे, नागरिकांचे दैनंदिन प्रश्न शासकीय कार्यालयातील नागरिकांची होणारी अडवणूक त्याचबरोबर त्यांच्या सुखदु:खात सहभाग घेतला जातो.

या मतदारसंघात उत्तर-पूर्व परिसराला जलसंजीवनी देणारी पुणेगाव – दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा योजना तत्कालीन आमदार स्व. जनार्दन पाटील यांनी मंजूर करून घेतली. या योजनेला पुनर्जीवित करून त्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करून मांजरपाडा वळण बंधारे योजना मंजूर करून घेऊन या योजनेचे ९०% काम पूर्ण झालेले आहे मात्र विद्यमान भाजपा सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे या योजनेत अडथळे निर्माण झाले आहेत.

ज्या आशेने येथील जनतेने नेतृत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपविली त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता त्यांचासाठी पुरेपूर सुविधा निर्माण करून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि भविष्यातही करीत राहणार आहे. महात्मा फुले नाट्यगृह , तात्या टोपे स्मारक, क्रीडा संकुल, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल, ग्रामीण रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर घाट, बोटिंग क्लब, स्व. मोहन गुंजाळ ट्राफिक पार्क, पैठणी पार्क, आय.टी.आय. इमारत, मागासवर्गीयांसाठी निवासी शाळा व वसतिगृह, तांत्रिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना आदी इमारती येवल्याच्या सौंदर्यीकरणात भर घालत आहेत.

सन १९३५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील भूमीवर “हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर नागपूर येथे लाखोंच्या जन्सामुदायासह त्यांनी धर्मांतर केले. रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली ही एकमेव सामाजिक क्रांती ठरली आहे. या ऐतिहासिक क्रांतीची सुरवात येथील पवित्र भूमीवरून झालेली आहे. दीक्षाभूमी, चैत्यभूमी प्रमाणेच या भूमीला महत्व आहे.

मात्र वर्षानुवर्षे येथील भूमी विकासापासून वंचित असल्याचे पाहून फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा पाईक म्हणून फार दुख झाले. ज्या व्यक्तिमत्वाची देशवासियांबरोबरच परदेशातही दखल घेतली गेली अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली “मुक्तिभूमी” साकारण्याचे भाग्य मला लाभले याचा शाहू, फुले, आंबेडकरांचा पाईक म्हणून मला सार्थ अभिमान व समाधान आहे.

समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन माझे देशभर कार्य सुरु आहे. त्याचेच प्रतिक म्हणून येथील विविध सत्ता स्थानावर सर्व समाजाच्या होतकरू व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बसवून खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करण्यात आली आहे. तरी सुद्धा अनेकदा खोडसाळ वृत्तीच्या लोकांकडून जातीयवादी असल्याचा अपप्रचार करतांना पाहून मात्र दु:ख झाल्याशिवाय राहत नाही.

राजकीय वाटचालीत यशाचा आलेख जसजसा उंचावत गेला तसतसा गुप्तशत्रूंच्या कारवायांचा देखील खूप त्रास सुरु झाला त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात विविध आग्निपरीक्षांना सामोरे जावे लागले. इतर मागासवर्गीय समाजातला एक तरुण मुत्सद्दी  राजकारणाबरोबरच लोकप्रिय होत चाललेला पाहून झारीतल्या शुक्राचार्यांनी अनेकदा विघ्न आणण्याचे काम केले.

अगदी अलीकडच्या काळातही हे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. राजधानी नवी दिल्लीतल्या ‘महाराष्ट्र सदन’ च्या निर्मितीवरून मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता ‘बांधा–वापरा-हस्तांतरित करा’ या धोरणानुसार रस्ते आणि शासकीय इमारतींचा विकास करण्याचे धोरण खरेतर युती सरकारच्या काळातच मुंबई-पुणे एक्स्प्रेस च्या निर्मितीच्या माध्यमातून सुरु झाले.

नवी दिल्ली मध्ये नवे आलिशान महाराष्ट्र सदन बांधण्याची आवश्यकता  असतांना, दिल्लीतील अत्यंत मोक्याची ठिकाणी जागाही राज्य शासनाच्या ताब्यात आली होती येथील सर्व कामे राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद  करून पूर्ण करणे  शक्य नव्हते म्हणून हे काम बीओटी तत्वावर पूर्ण करण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला मुख्यमंत्र्यांसह अनेक पातळीवर विविध वरिष्ठ सचिवांकडून अनेक वेळा त्याची पूर्ण छाननी केल्या नंतर तो मान्य करण्यात आला.

त्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या सर्व निकषांना उतरल्या नंतर ही कामे खाजगी विकासकाकडे सोपविण्यात आली. या कामांपैकी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राची शान ठरेल अशी नव्या महाराष्ट्र सदनाची दिमाखदार इमारत उभी राहिली. या वास्तुचे संपूर्ण विश्वभर कौतुक केले जात आहे. ही इमारत उभी करताना अनेक अडचणी, अडथळे आणि दिल्लीतील त्या भागाच्या कठोर नियमांना सामोरे जावे लागले.

असं सर्व काही कायदेशीर आणि नियमाला धरून असतांनाही या कामाशी सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने त्याचे श्रेय मिळू नये म्हणून उलटपक्षी माझ्या राजकीय भावितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी तसेच वाढत्या लोकप्रियतेवर आघात करण्यासाठी निखालस, बिनबुडाचे व निराधार आरोप करणे सरू झाले. परंतु अगदी पारदर्शी पद्धतीने हे काम करण्यात आले असल्यामुळे या शुक्लकाष्टातून माझी निर्दोष मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे.

विकासाची आणि कलासक्त सौंदर्याची दृष्टी असल्यामुळे येवल्याबरोबरच नाशिक जिल्ह्याचे पालकत्व निभावताना या परीसराच्या विकासाचं स्वप्न नाशिक विमानतळ, भव्य उड्डाणपूल, पर्यटन सुविधा, तीर्थ क्षेत्रांचा विकास, शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी, रस्ते, निर्मिती नंतर आधिक रंगतदार होत गेलं, ते तितकच समाधानकारक ठरल हे नक्की.

ही सर्व कामे पूर्ण करीत असतांना सन्मान, कौतुकाबरोबरच कधी कधी टिकेचेही धनी व्हावे लागले. परंतु या सर्व अग्नी परीक्षांना सामोरे जात असतांना दुख तर होतेच मात्र या परिसराच बदललेलं भव्य दिव्य आणि तितकेच सुंदर रूपडं पहिल्यानंतर मन भरून आल्या शिवाय राहत नाही.

आजपर्यंत कृत्रिमरीत्या निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे या प्रवासात व्यत्यय आला असला तरी माझी गुणवत्ता सिद्ध करण्याबरोबरच मागासवर्गीयांच कल्याण करावयाच असेल तर या सर्व अडथळयांमधून मला जावेच लागणार आहे. मात्र आपल्या सर्वांच्या प्रामाणिक आणि दमदार विश्वासाच्या जोरावर ही अडथळयांची शर्यत पार करीत पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे उपेक्षित, वंचित, पिडीत, दिनदलित वर्गाला पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे व राहील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!