‘एमएचटी सीईटी’आता अन्य दहा राज्यामध्ये; परीक्षेसाठी आता महाराष्ट्रात येण्याची गरज नाही

‘एमएचटी सीईटी’आता अन्य दहा राज्यामध्ये; परीक्षेसाठी आता महाराष्ट्रात येण्याची गरज नाही

नाशिक । प्रतिनिधी

राज्याच्या सीईटी सेलकडून यंदा एमएचटी-सीईटी परीक्षा महाराष्ट्रासह अन्य दहा राज्यांमध्ये घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना परीक्षेसाठी आता महाराष्ट्रात येण्याची गरज भासणार नाही. राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्ष (सीईटी सेल)ने एमएचटी सीईटी परीक्षेचा बाहेरील विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

या परीक्षेसाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात येण्याची गरज भासणार नाही.अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी आणि सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा 13 ते 23 एप्रिल या कालावधीत घेण्याचे नियोजन सीईटी सेलने केले आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भारतासह जगभरातील विविध देशातील विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.

त्यामुळे विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी महाराष्ट्रात यावे लागत असे. या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षी राज्याबाहेरच्या 16 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यांमध्येच परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.

त्यानुसार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, प. बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्येही परीक्षेचे एक केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये हे परीक्षा केंद्र असेल; तिथून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.

आधारची सक्ती नाही

एमएचटी सीईटीचा अर्ज विद्यार्थ्यांना कमी वेळेत भरता यावा यासाठी यंदा दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, अर्जात दोन वेळा भरावा लागणारा पत्ता आता एकदाच भरावा लागणार आहे. तर, अर्जासाठी दरवर्षी असणारी आधाराची सक्तीही काढून टाकण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्ड सक्तीचे नाही, असे आदेश दिल्याने सीईटी सेलने अर्ज भरताना आधार क्रमांकाची सक्ती काढून टाकली आहे.

29 फेब्रुवारीपर्यंत मुदत

एप्रिलमध्ये होणार्‍या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दोन दिवसांत सुमारे 1200 जणांनी अर्ज भरले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com