Photo Gallery : नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता; सगळीकडे शुकशुकाट, हळूहळू शहर पूर्वपदावर

0

नाशिक | सकल मराठा समाजाकडून आज शांततेत पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. डोंगरे वसतीगृह मैदानावर माजी आमदारांच्या गाडीचे नुकसान केल्यानंतर आंदोलक शहरात चाल करून आले. त्यानंतर मात्र प्रसंगावधान राखत पोलिसांनी कुमक वाढवली. दगडफेकीचा प्रयत्न हाणून पाडला. हजारो आंदोलक घोषणाबाजी करत शहरातील शालीमार, वडाळानाका, द्वारका परिसरात गेल्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाची परिस्थिती होती.

आज दुपारी अंतर्गत मतभेद आणि राजकीय नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांमध्ये बचाबाची झाली. शांततेत ठिय्या आंदोलन करणारे आंदोलक अचानक आक्रमक झाले आणि आंदोलकांचा गट मैदानावरून शहरात धडकला.

यावेळी आंदोलकांनी मेहेर सिग्नल चौकात दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत हा प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आंदोलक आक्रमक झाल्यामुळे अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, गंगापूर रोड, शालिमार, रविवार कारंजा, मेनरोड, शिवाजीरोड, भद्रकाली, जुने नाशिक या भागात पूर्णपणे बाजारपेठा बंद होत्या. गल्लीतून एखादे वाहन जाताना नजरेस पडत होते.

आंदोलन चिघळण्याची शक्यता दाट असल्यामुळे ठिकठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान, पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा शहरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी फेरफटका सुरु आहे.

दरम्यान, बोहोरपट्टी परिसरात  आंदोलनाची तीव्रता कमी झाल्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली होती. तसेच तुरळक रिक्षादेखील फिरतांना दिसून आल्या.

सर्व फोटो : पंकज जोशी, दिलीप कोठावदे, देशदूत डिजिटल नाशिक

LEAVE A REPLY

*