Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव मध्यमध्ये ३१, बाह्यमध्ये १५ तर बागलाणमध्ये ९ अर्ज दाखल

Share

मालेगाव-सटाणा । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघासाठी दोघा प्रमुख उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे सादर केले. याशिवाय इतर दहा उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले असून मालेगाव मध्य मतदार संघात आजपर्यंत 31 अर्ज दाखल झाले आहेत.

उद्या (दि. 5) दोन्ही मतदार संघात दाखल उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार असून सोमवारी माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजप महाआघाडीतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आज दोन नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे दाखल केले. तत्पुर्वी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भुसे समर्थकांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीत बंडुकाका बच्छाव, संजय दुसाने, सुरेश निकम, सुनिल गायकवाड, प्रमोद शुक्ला, निलेश आहेर, जयप्रकाश बच्छाव, जयराज बच्छाव आदींसह महाआघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पोलीस कवायत मैदानावर सभा झाली. यावेळी उमेदवार भुसे यांच्यासह महाआघाडीतील नेत्यांनी मार्गदर्शन केले.

मालेगाव बाह्य मतदार संघाची जागा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असली तरी यावेळी मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यात येवून जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना उमेदवारी जाहिर केली गेली. त्यांनी आज सकाळी 11 वाजता सटाणारोडवरील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांसह मिरवणूक काढून प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांच्याकडे नामांकन अर्ज सादर केला. त्यानंतर पोलीस कवायत मैदानावर सभा होवून त्यात उमेदवार डॉ. शेवाळे यांच्यासह महाआघाडीच्या नेत्यांनी आपली भुमिका मांडली. यावेळी अव्दय हिरे, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, डॉ. जयंत पवार, धर्मा भामरे, गुलाबराव चव्हाण, डॉ. राजेंद्र ठाकरे, शांताराम लाठर आदींसह महाआघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

मालेगाव बाह्य मतदार संघात काल दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मच्छिंद्र शिर्के यांनी आज पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अर्ज दाखल केला. याशिवाय बसपातर्फे आनंद आढाव तर आम आदमी पार्टीतर्फे मोहंमद सऊद सुलतान अहमद यांच्यासह कमालुद्दीन रियासतअली, मो. इस्माईल जुम्मन, अ. रशीद मो. इजहार, अबु गफ्फार मो. इस्माईल, काशिनाथ लखा सोनवणे, संदीप संतोष पाटील, किरण नाना मगरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.अंतीम मुदतीत एकुण 13 जणांचे 15 अर्ज दाखल झाले आहेत.

मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात 19 उमेदवारांचे 31 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आ. शेख आसिफ शेख रशीद, एमआयएमतर्फे मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, खालीद परवेज मो. युनूस, भाजपातर्फे शेख इब्राहीम शेख असलम, अखलाक अहमद मो. अय्युब, शेख सलीम शेख रज्जाक, दीपाली विवेक वारूळे, विजय गोविंद देवरे, महेकौसर लुकमान अन्सारी, हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे अ. हमीद शेख हबीब, वंचित आघाडीतर्फे शेख मुकीउद्दीन अब्दुल रशीद तर अपक्ष म्हणून बहबुद अब्दुल खालीक, मो. इस्माईल जुम्मन, सैय्यद सलीम सैय्यद अलीम, अब्दुल वाहिद मो. शरीफ, इमरान मो. इसाक, रऊफ खान कादीर खान, अ. खालीक गुलाम मोहंमद, मो.रिजवान मो. अकबर यांचा समावेश आहे.

बागलाणात 9 नामांकन अर्ज

बागलाण विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व 7 अपक्ष उमेदवारांसह एकूण नऊ जणांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे विद्यमान आ. दीपिका चव्हाण, भाजप-शिवसेना महायुतीतर्फे माजी आ. दिलीप बोरसे तसेच अपक्ष उमेदवार जि.प. सदस्य गणेश अहिरे, जि.प. सदस्या साधना गवळी, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, गीतांजली पवार-गोळे, राकेश घोडे यांचा समावेश आहे. उद्या (दि. 5) सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विजय भांगरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी केली जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!