नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्षपदी डॉ. सयाजीराव गायकवाड यांची निवड

नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्षपदी डॉ. सयाजीराव गायकवाड यांची निवड

नाशिक | प्रतिनिधी

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी डॉ.सयाजीराव गायकवाड यांची निवड झाली.

नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील आरक्षित असल्याने या पदासाठी चांगलीच स्पर्धा रंगली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीच सत्तेवर येणार का याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.

अखेर महाविकास आघाडीचे सूत जुळून आल्याने या निवडणुकीत अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर जे निफाड तालुक्यातील उगाव गटातील सदस्य आहेत यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी चांदवड तालुक्यातील दुगाव गटाचे सदस्य डॉ सयाजी गायकवाड विराजमान झाले.

आज जिल्हा परिषदेच्या नवीन रावसाहेब थोरात सभागृहात ही निवड पार पडली. आज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती.

तर 1 ते 1.15 वाजेदरम्यान दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली. 1.15 ते 1. 45 दरम्यान उमेदवारांना माघारीसाठी वेळ देण्यात आला होता.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून बाळासाहेब क्षीरसागर तर भाजपाकडून जे.डी. हिरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.सयाजी गायकवाड तर भाजपाकडून कान्हू गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

यानंतर अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर आणि उपाध्यक्षपदी डॉ. सयाजी गायकवाड यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com