Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सौदीत होणार ‘महाराष्ट्र सदन’; दोन लाख भाविक यंदा हज यात्रेला जाणार

Share

नाशिक | फारुक पठाण

काँग्रेस सरकारच्या काळात देशातून पवित्र हज यात्रेला जाणार्‍यांची संख्या फक्त १.२५ लाख होती. मोदी सरकार आल्यानंतर यात ७५ हजारांची वाढ झाली. यंदा पहिल्यांदाच देशातून २ लाख भाविक पवित्र हज यात्रेला जात आहेत.

तर पुढच्या वर्षापासून राज्य हज समितीच्या वतीने ‘उमराह’ यात्रादेखील सुरू होणार असल्याची माहिती राज्य हज कमिटी अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

सिद्दीकी आज नाशिक दौर्‍यावर होते. ‘सबका साथ, सब का विकास व ‘सब का विश्‍वास’ याप्रमाणे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ‘मोदी है तो मुमकीन है’ म्हणत २०१४ पर्यंत देशातून १.२५ लाख भाविकांना पवित्र हज यात्रेला जाण्याची संधी मिळायची.

यात सतत वाढ करून यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन लाख भाविक या पवित्र यात्रेला जाणार आहेत. यामुळे समाजात आनंद व्यक्त होत असून मुस्लीम समाज कॉंग्रेस सरकार व मोदी सरकार यांच्यातील कामाचा फरक स्वत: पाहत आहे. काँग्रेसने मतांचे राजकारण केले. आम्ही तसे करत नाही. आम्ही कामावर विश्‍वास ठेवतो. कॉंगे्रसने मुस्लीम समाजाचा वापर करून घेतला, मात्र त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कधीही योजना आखली नाही. यामुळे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

२०२० पासून ‘उमराह’

इस्लामी १२ वा महिना जिलहिज्जा असतो. या महिन्याच्या ९ तारखेपासून पुढील पाच दिवस पवित्र मक्का शरीफ येथे हज प्रक्रिया असते. पवित्र हज अदा करताना भाविकांना विविध ‘अरकान’ करणे बंधनकारक असते. या काळातच ते त्या ठिकाणी केले तर पवित्र हज झाल्याचे पुण्य प्राप्त होतो. तर इतर दिवसात पवित्र मक्का शरीफ व मदिना शरीफ येथे याच पद्धतीने (हजप्रमाणेच मात्र थोडे कमी अरकान) केल्यास त्याला पवित्र ‘उमराह’ म्हटले जाते. आतापर्यंत कमिटीच्या माध्यमातून फक्त पवित्र हज यात्रेला जाण्याची सुविधा होती. मात्र केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करून जानेवारी २०२० पासून कमिटीच्या माध्यमातून उमराह यात्रेला पाठवण्याचे कार्यदेखील होणार असल्याची माहिती सिद्दीकी यांनी दिली.

खासगीला १० टक्केच द्यावे

हज कमिटी पवित्र हज यात्रेला जाणार्‍या भाविकांकडून धंदा करीत नाही, मात्र खासगी टूरवाले थेट धंदा करतात. आम्ही २.४० लाखांत पाठवतो, तर खासगीवाल्यांचे दर साधारण ५ लाखांपासून पुढे आहे. देशातील एकूण २ लाखपैकी सुमारे ६० हजार भाविक म्हणजे सुमारे ३० टक्के लोक खासगी टूरने जाणार आहे. आम्ही केलेल्या एका तपासणी अहवालानुसार ९० टक्के लोकांनी कमिटीकडे अर्ज केलेले होते. त्यांचे नंबर न लागल्याने ते खासगी टूरद्वारे हजसाठी जातात, असे समोर आले. यामुळे खासगी टूरचा कोटा फक्त १० टक्के करण्यात यावा व बाकी सर्वांना कमिटीच्या माध्यमातून पाठवण्यात यावे, अशी मागणी आम्ही केंद्र सरकाराकडे केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाविकांना लुटणार्‍यांवर ‘मोक्का’

गत काही वर्षांत खासगी टूरद्वारे उमराह व हज यात्रेच्या नावाखाली भाविकांकडून लाखो रुपये घेण्यात येऊन त्यांना यात्रेला न पाठवता मोठा भ्रष्टाचार केल्याच्या अनेक घटना राज्यातील विविध भागात घडल्या आहेत. याबाबत रितसर तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. ज्याप्रमाणे भूमाफिया असतात, त्याचप्रमाणे आता टूरमाफिया तयार झाले आहेत. असे गुन्हे करणार्‍यांवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून लवकरच यावर निर्णय होणार असल्याचे हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.

सौदीत ‘महाराष्ट्र सदन’

ज्याप्रमाणे नवीन दिल्लीत देशातील सर्व राज्यांचे सदन आहे त्याचप्रमाणे सौदी अरेबिया येथे राज्यातील हज व उमराह यात्रेकरूंसाठी ‘महाराष्ट्र सदन’ तयार करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. याबाबत विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला जाणार्‍या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी कायम आपली इमारत त्या ठिकाणी हवी म्हणून ही संकल्पना आम्ही मांडल्याचे जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!