करोना लढ्यात वस्त्रोद्योग क्षेत्राची भक्कम साथ – केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला, बालकल्याण मंत्री- स्मृती इराणी

करोना लढ्यात वस्त्रोद्योग क्षेत्राची भक्कम साथ – केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला, बालकल्याण मंत्री- स्मृती इराणी

वित्त मंत्रालयाद्वारेच वस्त्रोद्योगाच्या पॅकेजची घोषणा

सातपूर ।प्रतिनिधी

करोना विरूध्दच्या लढ्यात भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राने भक्कम साथ दिली असुन १ मार्च रोजी एक ही पीपीई कीट न बनवणार्‍या देशात आज रोज दोन लाख पीपीई कीट तयार होत आहेत ही बाब गौरवपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला, बालकल्याण मंत्री ना. स्मृती इराणी यांनी केले.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंड., अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड एज्युकेशन (वेसमॅक) यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलत होत्या.

कॉन्फेडरेशन चे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी स्वागत केले. महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी प्रास्ताविकात वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अडचणी विषद केल्या. कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व वेसमॅक चे अध्यक्ष ललित गांधी यांनी देशाच्या विविध भागातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील संस्थांनी मांडलेल्या मुद्यांची माहीती दिली.त्यात लॉकडाऊन काळातील वेतन, टफ स्कीममधील अडचणी, बँक कर्जावरील व्याजदर, चीनमधुन होणार्‍या आयातीस प्रतिबंध आदी मुद्दयांचा समावेश होता.

वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून नवीन पीपीई कीट च्या प्रयोगशाळा चाचण्या, उत्पादन परवानगी आदी बाबी तात्काळ निकालात काढू असे जाहीर केले.

सध्या देशात २०० पीपीई कीट उत्पादन करणारे कारखाने कार्यरत असुन त्यांना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. तसेच नवीन ४०० कंपन्यांनी उत्पादनाची परवानगी मागितली असुन त्यापैकी २०० परवानग्या दिल्या आहेत. अन्य परवानगीची प्रतिक्रियाही लवकर पूर्ण केली जाईल अशी माहीती ना.स्मृती इराणी यांनी दिली. कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय संगठन मंत्री धैर्यशील पाटील यांच्यासह देशभरातील ४२५ हुन अधिक विविध संस्था प्रतिनिधिंनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता.

वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अन्य मंत्रालयाकडील अपेक्षा विशेषतः अर्थमंत्रालय व वाणिज्य मंत्रालयांशी संबंधित विषय त्या त्या विभागाकडे पाठविले असुन पॅकेजची घोषणा होईल त्यावेळी सर्व क्षेत्रांना योग्य न्याय मिळेल. ‘वस्त्रोद्योग क्षेत्राने पॅकेज मागू नये’ अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या या निराधार असून आपण असे वक्तव्य कधीही केले नाही. ज्या बैठकीतील ही बातमी असल्याचे सांगितले जात आहे त्या बैठकीचे रेकॉर्डिंगही आपल्याकडे उपलब्ध असून, आपण वस्त्रोद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
– स्मृति ईराणी
केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला, बालकल्याण मंत्री

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com