Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘टायरबेस मेट्रो’ प्रकल्प अव्यवहार्य; मंत्री छगन भुजबळ यांचा घणाघात

‘टायरबेस मेट्रो’ प्रकल्प अव्यवहार्य; मंत्री छगन भुजबळ यांचा घणाघात

नागपूर । गणेश सावंत

नाशिक शहरासाठी मोठा गाजावाजा करीत घोषणा केलेला देशातील पहिला टायरबेस बस प्रकल्प हा अव्यवहार्य असून त्याचा पुनर्विचार करावा लागेल, कारण या प्रकल्पातून फार काही साधले जाईल असे दिसत नाही, उलट त्यामुळे शहराची वाताहत होईल, असा घणाघात राज्याचे ग्रामविकास आणि सामाजिक न्यायमंत्री छगन भुजबळ यांनी ‘देशदूत’शी बोलताना केला. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे भाजप सरकारच्या कारकीर्दीत जाहीर झालेला, विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता रेंगाळण्याची शक्यता बळावली आहे.

- Advertisement -

माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी राज्याच्या विविध भागात त्यांच्या विभागामार्फत जे प्रकल्प हाती घेतले होते त्याची व्यवहार्यता तपासून पाहिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात पर्यटन विभागामार्फत हाती घेतलेल्या कामांबाबतही भुजबळ यांनी मतप्रदर्शन केले. गंगापूर धरणात बोट क्लब साकारण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी विदेशातून ४० बोटी आणल्या. मात्र मधल्या काळात या बोटींचे काय झाले याचा तपास लागलेला नाही. मागील सरकारच्या काळातील प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून पाहणे यात काही गैर नाही. प्रत्येक सरकार तेच करते, आम्हीही तेच केले, असे भुजबळ म्हणाले.

नाशिक शहर आणि जिल्ह्यात मागील सरकारने जे प्रकल्प हाती घेतले ते आम्ही नक्कीच तपासू. पुणे, नागपूर येथे मेट्रोची कामे सुरू आहेत. या दोन्ही शहरांची वाताहत झाली आहे. नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत . त्यामुळे अनेक चांगले रस्ते फोडले गेले आहेत. शिवाय या मेट्रोला प्रतिसादही फार नाही. मोजकेच प्रवाशी या मेट्रोने प्रवास करतात. त्यामुळे आर्थिक फटकाही बसतो. आता नागपूरसारखीच नाशिकचीही वाताहत करावयाची का? टायरबेस मेट्रोचा किती उपयोग नाशिकला होईल याचीही शंकाच आहे. उगीच मोठी स्वप्ने दाखवण्यात अर्थ नाही. त्यामुळे व्यवहार्य परिस्थिती पाहूनच ही टायरबेस मेट्रो पूर्णत्वास न्यावयाची का ते ठरवले जाईल. आतापर्यंत या प्रकल्पावर किती खर्च झाला याचीही माहिती घेऊ, असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी बोलतांना भुजबळ यांनी आपण नाशिकसाठी अनेक प्रकल्प आणले. शहर सुधारण्याचा प्रयत्न केला, मात्र, तरीही माझा, समीर भुजबळ यांचा पराभव झाला अशी खंतही भुजबळ यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या