Saturday, April 27, 2024
Homeनाशिकशहर पोलिसांची पाच विशेष भरारी पथके

शहर पोलिसांची पाच विशेष भरारी पथके

मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार रोखणार

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एन-९५ मास्क, पी.पी.ई किटस् आणि सॅनिटायझरला मोठी मागणी आहे. याचा काळा बाजार रोखण्यासाठी शहर पोलिसांची पाच विशेष भरारी पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
करोना विषाणूचा जगभरात तसेच देशातही मोठ्या प्रमाणात फैलाव सुरू झाला आहे. नाशिक शहर तसेच जिल्ह्यात याचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंध म्हणून साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ निर्गमित करण्यात आला आहे.

तसेच पोलीस आयुक्तांनी कलम १४४ नुसार शहरात जमावबंदी लागू केली आहे. याद्वारे नाशिक शहरातील गर्दीची ठिकाणे, आस्थापना, दुकाने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, तरणतलाव, मॉल, बिग बाजार, व्यायामशाळा यासह इतर गर्दी होऊ शकेल अशा सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मास्क व सॅनिटायझरचा काळा बाजार तसेच अन्नधान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ लागू करण्यात आला आहे.

प्रामुख्याने या विषाणूस प्रतिबंधासाठी चेहर्‍यावर एन-९५ मास्क वापरणे तसेच सतत हात स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभाग तसेच शासकीय यंत्रणा सातत्याने करत आहेत. हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर आरोग्य विभागाचे सेवक मास्क वापरत असल्याने त्याचे साठे मार्यादित होते; परंतु करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी याचा साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे.

हा तुटवडा दाखवून चढ्या भावाने मास्क तसेच सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. तर अनेक भागात बनावट सॅनिटायझर तयार करून ते सामान्य नागरिकांच्या माथी मारण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा कारवाईसाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन तसेच आरोग्य विभाग, महापालिकेचे अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने कारवायाही केल्या, मात्र एकच पथक व वाढते गैरप्रकार यामुळे पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. यातून होणारी नागरिकांची लूट रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासन पुढे सरसावले आहे.

पोलीस प्रशासनाच्या दोन परिमंडळाअंतर्गत चार विभागात पथकांची निर्मिती केली आहे. तर विभाग दोन हा शहरातील मध्यवर्ती भाग येत असल्याने तसेच बहुतांश औषध विक्रेते, होलसेलर याच विभागात असल्याने विभाग दोनमध्ये दोन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ही सर्व पथके आपापल्या विभागातील संशयित आस्थापना तसेच ठिकाणांवर अचानक छापे टाकून कारवाई करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या