Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलासलगावला २० हजार क्विंटल कांदा आवक

लासलगावला २० हजार क्विंटल कांदा आवक

लासलगाव । प्रतिनिधी 

भारतात होणारी कांदा आयात मंदावल्याने लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊनही भाव स्थिर असल्याचे दिसून आले. १५ जुलै  रोजी २४ हजार ९०० क्विंटल आवक होऊन त्यास ५०० रूपयांपासून १३६८ रुपये भाव मिळाला होता. पाच महिन्यांच्या कालावधीनंतर दोन हजार वाहनांनी बाजार समिती आवारात गजबजून गेले होते.

- Advertisement -

काल  प्रथमच लासलगाव बाजार समितीमध्ये वीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीची कोंडी दिसून आली. लासलगाव बाजारात कांद्याची आवक ढगाळ वातावरणामुळे मंदावल्याने बाजारभावात चढ-उतार झाले. १७ डिसेंबर रोजी लाल कांद्याला ऐतिहासिक १११११ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दररोज टप्प्याटप्प्याने ३७०० रूपयांची घसरण होत २१ डिसेंबर रोजी ७४०१ रुपये भाव मिळाला.

तुर्कस्तानकडून भारतात होणारी आयात थांबल्याने कांद्याच्या आवकमध्ये वाढ होऊन ८००० रुपयांवर भाव स्थिर राहिले. काल  येथील बाजार समितीत १९३३ वाहनातून लाल कांद्याची २०९७० क्विंटल आवक होऊन कमीत कमी २०००, जास्तीत जास्त ८१०० तर सरासरी ६५०१ रुपये भाव मिळाला.

लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढत असल्याने शहराच्या मुख्य मार्गांवर वाहनांची कोंडी होत आहे. कांदा वाहनधारकांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या