दिलासादायक : एसटीचा संप आज मिटण्याची शक्यता

0

नाशिक । दि. 20 प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रवाशांना दिलासादायक ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंची संपाबाबत मध्यस्थी, मुख्यमंत्री आणि दिवाकर रावतेंसोबत फोनवरुन चर्चा झाली असून त्यात संपावर तोडगा काढण्याचे नक्की झाल्याचे समजते.

दरम्यान एसटी कर्मचार्‍यांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला असून त्यांना निलंबित करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने देत जनहित याचिकेची सुनावणी उद्या शुक्रवारपर्यंत स्थगित केली आहे.

मात्र विविध बसस्थानकांवर वाहक आणि चालकांच्या विश्रांतीगृहात पाणी, लाईट जोडणी तोडण्याचे पातक एसटी प्रशासन करीत आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे. संपकर्‍यांना प्रशासन ऐन दिवाळीत सापत्न वागणूक देत असल्याची भावना होत असल्याचा सूर एसटी कर्मचारी व्यक्त करू लागले आहेत.

संपाच्या तिसर्‍या दिवशी कोणताही तोडगा निघालेला नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते संपाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेल्याची चर्चा एसटी कर्मचार्‍यांमध्ये आज होती. त्याचबरोबर एसटी प्रशासन होमगार्डच्या मदतीने प्रवासी वाहतूक करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

मात्र एसटीची एकही गाडी जागेवरून निघाली नाही. त्यामुळे महामार्ग, ठक्कर बाजार, जुने सीबीएस येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटल्या नाही. या बसस्थानकांवर शुकशुकाट होता. ठक्कर बाजार बसस्थानक तर दुचाकी, चारचाकी वाहनांचे पार्किंगस्थळ झाले होते. महामार्ग बसस्थानकावर काही चालक-वाहकांनी आपल्या ताब्यातील गाड्या धुवून लक्ष्मीपूजनाची तयारी केली होती. तर जुने मध्यवर्ती बसस्थानकात चिटपाखरूही दिसत नव्हते.

एसटी संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या मते काही बसस्थानकांवर अडकून असलेल्या वाहक आणि चालकांना विश्रांतीगृहातून बाहेर काढण्यासाठी फरशीवर पाणी टाकणे तसेच लाईट बंद करणे असे प्रकार प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठक्कर बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे वाहक आणि चालकांची तारांबळ होईल अशी परिस्थिती होती.

न्यायालयाने खासगी वाहनांना एसटी बसस्थानकात जाऊन प्रवासी भरण्याची मुभा दिलेली असली तरी खासगी वाहतूकदारांनी नाशिकमधील कोणत्याही बसस्थानकात जाऊन प्रवासी भरण्याची हिंमत केली नाही.

कारण संप मिटल्यानंतर संभाव्य परिणामांची भीती सतावत असल्याचे खासगी वाहतूकदारांच्या मध्यस्थांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, खासगी वाहतूकच दिवाळीच्या गर्दीत सुरू असल्याने प्रवाशांना बाहेरगावी जाण्यासाठी हे एकमेव साधन आहे.

त्यामुळे प्रवाशांना जादा दर आकारून वाहतूक करण्यात येत असल्याची ओरड आरटीओकडे झाल्याने आरटीओकडून खासगी वाहनांचे प्रवासी दर आकारणी तपासली जात होती. त्यासाठी आरटीओची पथके महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार आणि इतर बसस्थानक परिसरात गस्त घालत होती.

LEAVE A REPLY

*