उसतोड कामगाराची कन्या झाली फौजदार

खरवंडी येथील सीमाच्या यशाबद्दल उपसभापती भागवत यांनी केला सत्कार

0
सायगाव | वार्ताहर येवला तालुक्यातील खरवंडी येथील सीमा काशिनाथ खडांगळे हिने महाराष्ट्रातून अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यसेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात फौजदार पद मिळवले. यात तिचा राज्यात १७ वा क्रमांक आला. त्याबद्दल येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांचेसह देविदास जानराव, एकनाथ भालेराव, ज्ञानेश्वर भागवत, मनोज भागवत यांनी अभिनंदन केले.

सीमा ने हे यश संपादन करण्यासाठी दिलेले योगदान व सुखाचा केलेला त्याग पाहून या संपूर्ण कुटुंबाला या यशाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. येवला तालुक्यातील खरवंडी हे तसं दुष्काळी गाव. काशिनाथ फकिरा खडांगळे हे येथील ऊसतोड कामगार आहेत.

वडीलासह पाच चुलते असे पाच भावांचे एकत्रित कुटुंब. घरची परिस्थिती अतिशय बेताची. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने आर्थिक उत्पन्न बेभरवशाचे. त्यामुळे ऊसतोड सोडून दुसरा पर्याय नव्हता. घरात कुठलाही शैक्षणिक वारसा नसून देखील चुलते कारभारी खंडागळे यांची जबरदस्त इच्छाशक्ती व शिक्षणावरील विश्वास, भावनिक आधार, घरातील संस्कार तसेच ’शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो पेइल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, मोठे चुलते यांची हिंमत सीमासाठी प्रेरक ठरली.

खरवंडी गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण घेऊन सीमाने मनमाड येथे सेंट झेवियर मनमाड बोर्डिंग स्कूल मध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणा पासून पोलीस खात्यात जायचे असा मानस होताच.

त्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल भरती देखील केली. व अवघ्या एक गुणाने हुलकावणी दिली. मात्र प्रयत्न न सोडता तिने स्पर्धा परीक्षेचा जोमाने अभ्यास सुरु केला व ज्या मैदानावर पोलीसाची नोकरी एका गुणाने गेली त्याच मैदानावर पोलिस निरीक्षकाची फिजिकल परीक्षा दिली. तेव्हा गर्वाने मान उंच झाली. बी. ए., एम. ए. इंग्लिश व इतिहास स्पेशल घेऊन नाशिक येथे पूर्ण केले.

समाज कल्याण विभाग नाशिकच्या होस्टेल ला राहून अभ्यासाची तयारी केली. तीला गणेश सास्ते यांनी मदत केली. प्रसंगी फॉर्म भरण्यासाठी पैसे नसतांना सास्ते तिला न माहित फॉर्म भरून देत असत.

अतिशय बिकट व प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक, शैक्षणिक पाठबळ नसतांना कुठलीही करिअर ऍकॅडमी जॉईंट न करता मिळवलेले हे यश खरच ग्रामीण भागातील तरुणांसाठी व तारुणींसाठी प्रेरणादायी आहे. गरीब परिस्थितीतून मुलगी शिकवणे व समोरच्या परिस्थितीला तोंड देणे. किती अवघड असते हे त्या कुटुंबाकडे गेल्यावर समजले. हा आदर्श नक्कीच गावाकडच्या लोकांना तरुणांना घेण्यासारखा आहे.
– रुपचंद भागवत, उपसभापती, पंचायत समिती येवला

अनु. जाती या राखीव जागेसाठी मुलींसाठी २९ जागा होत्या. त्यात १७ व्या क्रमांकावर यश मिळवले. जि प शाळा मराठी माध्यमातून माझा पाया पक्का झाला. माझ्या या यशामागे ग्रामस्थ, मित्रमंडळ, पाहुणे, यांचा देखील मोलाचा वाटा आहे व त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील तसेच यांच्या या सहकार्यामुळेच मी यशस्वी झाले. तहसीलदार होण्याचं माझं स्वप्न आहे. मी तहसीलदार होणारच असा मला आत्मविश्वास आहे.
– सीमा खडांगळे, खरवंडी

LEAVE A REPLY

*