वाहनाच्या धडकेत मोराचा मृत्य

0

वावी | वार्ताहर  सिन्नर-शिर्डी महामार्गावर वावी शिवारात रस्ता ओलांडणार्‍या मोराला अज्ञात वाहनाने धडकावल्याची घटना आज दि. १२ पहाटेच्या सुमारास निदर्शनास आली. जखमी झालेल्या या मोराचा रक्तस्रावाने मृत्यू झाला.

वावी व परिसरात मोरांची संख्या गेल्या ३-४ वर्षांपासून वाढली आहे. या भागातील अनुकूल परिस्थिती पाहता शेकडोच्या संख्येने मोरांचे वास्तव्य असून अन्न -पाण्याच्या शोधात भटकंती करणार्‍या मोरांचा वावर रहिवासी वस्तीकडे देखील वाढला आहे.

सिन्नर शिर्डी महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अनेकदा मोरांचे दर्शन होत असते. आज पाहटे फिरायला गेलेल्या वावी येथील भाऊराव शेळके या रहिवाश्याला शिर्डी रस्त्यालगत गतप्राण झालेला मोर आढळून आला.

रात्री किंवा पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाचा धक्का लागून या मोराचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. मृत झालेल्या या मोराचे कावळ्यांकडून लचके तोडण्यात येत होते तर बाजूच्या शेतात ७-८ मोरांचा थवा देखील बसून होता.

शेळके यांनी मित्रांच्या मदतीने वनविभागाला सूचित केल्यावर कर्मचारी नारायण वैद्य यांनी सदर मोराला ताब्यात घेतले. सिन्नर येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दैवशाला अलकुंटे यांनी त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी के. आर. इरकर, पी. ए. सरोदे, रमेश कवडे, गोरख बागुल आदींच्या उपस्थितीत वनक्षेत्रात अन्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*