आदिवासी कुटुंबांना वनविभागाकडून गॅस वाटप

0
सिन्नर  वार्ताहर  वनक्षेत्रातील झाडांची जळाऊ लाकडासाठी होणारी तोड थांबावी यासाठी वनविभागाच्या योजनेतून तालुक्यातील वडझिरे येथील ३१ आदिवासी कुटुंबांना गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी १७ कुटुंबांना नुकतेच गॅस वाटप करण्यात आले.

सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर बोडके यांनी त्यांच्या कार्यकाळात गावातील आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण करून वनविभागाच्या मोफत गॅस जोडणी योजनेसाठी लाभार्थी निवडले होते. अनुसूचित जाती जमाती गटासाठी असणार्‍या या योजनेतून सुमारे ३१ कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनचा लाभ मिळाला असून गावात आयोजित कार्यक्रमात यापैकी १७ लाभार्थीना गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले.

सरपंच अंबादास बोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, सेवानिवृत्त अधिकारी बोडके, वनरक्षक पोपट बिन्नर, अनिल साळवे, अर्जुन बोडके, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोडके, लहानू बोडके, आप्पा दराडे, तुकाराम शेळके, तुळशीराम ठोंबरे, सुनील ठोंबरे, गोरख ठोंबरे, भास्कर गीते, शरद नागरे, बस्तीराम दराडे यांचेसह लाभार्थी कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते.

वडझिरे येथे वनग्राम उभारणीसाठी ग्रामस्थ आवश्यक ते सहकार्य करायला तयार असल्याचे अर्जुन बोडके यांनी सांगितले. धूरमुक्त शिवार, चराईबंदी, वृक्षतोड या योजनांमध्ये ग्रामस्थ वनविभागाला सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांच्या हस्ते वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*