बागलाणला कुणी तहसिलदार देता कां?

विधीमंडळ पायरीवर आ. दिपीका चव्हाण यांच्यासह तिघा महिला आमदारांची घोषणाबाजी

0
सटाणा |ता.प्रतिनिधी  गत ९ महिन्यांपासून बागलाण तहसिल कार्यालयात कायमस्वरूपी तहसिलदारांची नियुक्ती नसल्याने आदिवासींसह सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीसह विविध पक्ष संघटनांतर्फे आंदोलने देखील केली गेली. मात्र तहसिलदारांची नियुक्ती प्रशासनातर्फे होत नसल्याच्या निषेधार्थ आज नागपूर येथे विधीमंडळाच्या पायरीवर तहसिलदार देता का कुणी? या मागणीचा बॅनर झळकावत आ. दिपीका चव्हाण यांच्यासह तिघा महिला आमदारांनी घोषणा देत राज्य शासनाचे लक्ष वेधले.

कायमस्वरूपी तहसिलदार नियुक्त नसल्यामुळे आदिवासींसह सर्वसामान्य जनतेची फरपट होत असून अनेक कामे रखडल्याने जनतेत शासनासह लोकप्रतिनिधीबद्दल तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सदर असंतोष थांबविण्यासाठी येत्या आठ दिवसाच्या आत बागलाणास तहसिलदार मिळावा अन्यथा विधीमंडळाच्या पायरीवर बसून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दिपीका चव्हाण यांनी आज निवेदन देत दिला आहे.

बागलाण तहसिल कार्यालयात गत ९ महिन्यांपासून कायमस्वरूपी तहसिलदार नियुक्त नसल्याने प्रभारी तहसिलदारांतर्फे वेळ मिळेल तेव्हा कामकाज पाहिले जाते. मात्र यामुळे तहसिलची कामे रखडली आहेत. बागलाण तालुका आदिवासी बहुल असल्याने तसेच भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे या भागातील नागरीकांची कामे रखडत आहेत.

विद्यार्थ्यांना लागणार्‍या शालेय दाखले, शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले, पाणीटंचाई, गौण खनिज, कुळ कायद्याची प्रकरणे आदी अनेक कामे पुर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे रखडली असल्याने जनतेस विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तहसिलदार नियुक्तीसाठी विविध पक्ष संघटनांतर्फे आंदोलने छेडण्यात येवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आश्‍वासनापलिकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मागणीची दखल गांभीर्याने घेतली नसल्याने गत ९ महिन्यांपासून हे पद रिक्त राहिले आहे.

शासनातर्फे मागणीची दखल घेतली जात नसल्याने आज बागलाण आ. दिपीका चव्हाण यांनी आ. अमिता अशोक चव्हाण, आ. संध्या कुपेकर, ज्योती कलानी या महिला आमदारांसह विधीमंडळाच्या पायरीवर तहसिलदार देता का कुणी? तहसिलदार? असा बॅनर हातात घेत घोषणाबाजी करत आंदोलन करत राज्य सरकारचे लक्ष वेधले.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायमस्वरूपी तहसिलदार नियुक्तीचे निवेदन आ. चव्हाण यांनी दिले. मुख्यमंत्री, महसुलमंत्री व पालकमंत्र्यांना यासाठी निवेदन देत वारंवार आपण पाठपुरावा केला. मात्र बागलाण तहसिलदाराची कायमस्वरूपी नियुक्ती अद्यापपर्यंत झालेली नसल्यामुळे हे आंदोलन करावे लागले आहे.

येत्या आठ दिवसात कायमस्वरूपी तहसिलदार नियुक्त न झाल्यास विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आ. चव्हाण यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*