निफाड तालुक्यात २०७५१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत

महिन्यानंतरही गणवेशाची रक्कम अद्याप शाळेच्या खाती नाही, स्वातंत्र्यदिनापुर्वी गणवेश मिळणे गरजेचे

0

प्रती विद्यार्थी मिळणार दोन गणवेश

दोन गणवेशासाठी ६०० रु. प्रती विद्यार्थी

शाळा व्य. समिती करणार गणवेश खरेदी

पाठ्यपुस्तके सर्वांना मात्र गणवेशात दुजाभाव

जुन्या गणवेशातच विद्यार्थ्यांची भरते शाळा

निफाड| आनंदा जाधव शाळा सुरु होवुन महिनाभराचा कालावधी लोटला असतांनाही अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळु न शकल्याने जुन्या गणवेशात विद्यार्थ्यांची शाळा सुरु आहे. मागील वर्षाचा कटू अनुभव लक्षात घेता यावर्षी शिक्षण विभागाने गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले असले तरी अद्याप या गणवेशाची रक्कम शाळेच्या खाती वर्ग न झाल्याने निफाड तालुक्यातील २०७५१ विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत असुन निदान १५ ऑगस्टपुर्वी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे गरजेचे आहे.

शिक्षण विभागाने विद्यार्थी हित लक्षात घेवुन कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी विविध योजना जाहिर करुन त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. तसेच खेळ, कला, क्रिडा यांना महत्व देत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याचा प्रयत्न केला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असला तरी ज्या प्रकारे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याची तत्परता दाखवली.

मात्र त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देणे गरजेचे असतांना येथे मात्र शिक्षण विभागाने हात आखडता घेतला आहे. आता शाळा सुरु होवुन महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही.

निफाड तालुक्यात इयत्ता १ ली ते ८ वी च्या जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची ही योजना असली तरी यात १२९६१ मुली तर अनु.जाती १६७२ मुले, अनु.जमाती ५०९७ मुले व दारिद्रय रेषेखालील १०२१ मुले अशी एकुण २०७५१ विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाही. मागील वर्षी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना ० बॅलन्सवर बँकेत खाते उघडण्यास सांगुन प्रति विद्यार्थी २ गणवेशासाठी ५०० रुपये विद्यार्थी बँक खाती जमा केले होते.

परंतु खात्यावर ० बॅलन्स असल्याने बँकेने ही रक्कम खात्यावर वर्ग करुन घेतली होती तर काही पालकांनी या रकमेचा दुरुपयोग केला होता. परिणामी यावर्षी विद्यार्थी गणवेश खरेदीचे अधिकार शाळा स्तरावर शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे. मात्र अद्यापपर्यंत गणवेशाची रक्कम शाळेच्या खाती वर्ग न झाल्याने या समितीची बैठक कधी होणार व गणवेशाची खरेदी होवुन ते विद्यार्थ्यांना कधी मिळणार याचा काहीएक उलगडा होत नाही.

तसे पाहता विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करण्याऐवजी सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या शिक्षण विभागाने शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र तसे होत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये उदासिनतेची भावना दिसून येत आहे.

त्यामुळे आता ‘झाले गेले गंगेला मिळाले’ हा न्याय लावत निदान या विद्यार्थ्यांचा येणारा स्वातंत्र्य दिन तरी गणवेशात साजरा झाला पाहिजे अशी अपेक्षा निफाड तालुक्यातील विद्यार्थी पालक, ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

दोन दिवसात गणवेश रक्कम वर्ग होईल
आज किंवा उद्या गणवेशाची रक्कम प.स. कडे वर्ग झाल्यास तत्पर कार्यवाही करुन ही रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल? त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करुन तत्पर कार्यवाही करावी. मागील वर्षापर्यंत दोन गणवेशासाठी ५०० रुपये दिले जात होते. यावर्षी त्यात १०० रुपयांनी वाढ करुन दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ६०० रुपये देण्यात येणार आहे.
विजय खालकर, विषयतज्ञ शिक्षणविभाग प.स. निफाड

 

LEAVE A REPLY

*