प्रोजेक्टच्या नावाखाली सव्वा कोटीची फसवणुक

उपनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

0
नाशिकरोड |प्रतिनिधी रिसॉर्ट उभारून महिन्याला ५ ते १० लाख रूपये उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवुन चारजणांनी एका इसमाची सुमारे १ कोटी २९ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमित श्रीरंग कळमकर (३१), रा. स्वामी कृपा, वीर सावरकर नगर, शिवाजीनगर, जेलरोड यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जानेवारी २०१७ मध्ये त्यांचा मित्र अभिषेक अविनाश कुलकर्णी (३५), रा.सिद्धेश्‍वर नगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड, प्राची आगरकर हे घरी आले व आपल्याला रिसॉर्ट टाकायचे आहे.

त्याकरीता २ ते ३ कोटी रूपयांची गरज असून आम्ही प्रत्येकी एक कोटी रूपये गुंतविणार आहोत. तुम्हीही एक कोटी रूपये प्रोजेक्टमध्ये गुंतवल्यास दरमहा ५ ते १० लाख रूपये नफा मिळेल, असे सांगितले. मात्र कळमकर व त्यांच्या भावाने नकार दिला.

तरीही ते पैशाच्या मागणीकरीता मागे लागले.अभिषेक यांची आई आशा कुलकर्णी या बँक ऑफ महाराष्ट्रच्या टिळक रोड शाखेत असून आपल्याला फॉरेन फंडींग मिळण्यास अडचण येणार नाही. बँकेच्या अकांउटला २ ते ३ कोटी रूपये भाग भांडवल दाखवून १५ ते २० कोटी रूपये फॉरेन फंडींग मिळू शकतो, ते मी मिळवून देईन व तुमच्या पैशांची हमी मी घेते, असे सांगीतले असता आम्ही आमची विचुंर येथे असलेली आठ एकर जागा विकली त्यातून आलेले पैसे कुलकर्णी यांचे वेंचर प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या खात्यात रोखीने तसेच आरटीजीएस करून वेळोवेळी सुमारे १ कोटी २९ लाख रूपये भरले. याबाबत एक महिन्यानंतर आम्ही त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी टाळाटाळ केली.

पुन्हा विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे आल्यानंतर तुमचे पैसे देऊ, तुम्ही आमच्या मागे लागू नका, आमचे अनेक गुंड ओळखीचे असून तुम्हाला मारहाण करू, असा दम दिला.
दरम्यान संशयीत अभिशेक कुलकर्णी, त्याचे वडील अविनाश कुलकर्णी, आई आशा कुलकर्णी व प्राची आगरकर यांनी आमची फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

*