खेडगावातील रस्ते चिखलमय

0
खेडगाव|वार्ताहर  दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

खेडगाव फाटा ते राजीवनगर रस्त्यावर चिखल झाल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पहिल्याच पावसात अपघाताच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. टँकरद्वारे पाणी आणून ग्रामस्थांना रस्त्यावरील चिखल साफ करण्याची वेळ आली आहे.

अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्ती होत नसल्याने मागील वर्षी डांबरीकरण असलेल्या रस्तावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले होते. परंतु, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दळणवळण असल्याने खड्डे जैसे थे होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत.

खेडगाव ते रत्नगड रस्त्यावरील पाराशरी नदीवरील पुल जीवघेणा ठरू पाहात आहे. पहिल्याच पावसात खेडगाव येथील नदी पुलावर जीवघेणे खड्डे पडल्याने पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. या मार्गावर वाहनाची नेहमीच वर्दळ असते.

रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता हेच वाहनचालकांना समजत नसल्याने खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर आठवडे बाजार भरला जात असून बाजारपेठ, प्राथमिक शाळा, विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जवाहर नवोदय विद्यालय, राजीवनगर वस्ती येत असून दोन तालुक्यांना जाणारा रस्ता आहे.

अवजड वाहने रात्रंदिवस ये-जा करीत असतात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेची वाहने या मार्गावरून जात असल्याने रस्ता लवकर खराब होतो. पाराशरी नदीवरील पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे.

प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात येत नाही. अरुंद पूल तसेच खड्ड्यांमुळे या मार्गावर नियमित वाहतुकीचा खोळंबा होतो. या मार्गाने वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहने जात असल्याने सातत्याने हा मार्ग खराब होतो.

त्यामुळे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून खेडगाव परिसरातील रस्ते व नदीपुलाची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी व वाहनधारकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*