पोळ्यासाठी बळीराजाची लगबग

0
नवीन नाशिक  शेती, शेतकरी आणि बैल यांच्या अनन्यसाधारण संबंधांचे प्रकटीकरण करणारा उत्सव..अर्थात पोळा रविवार दि. ९ रोजी पारंपारिक पद्धतीना साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात या सणाला तर खूपच महत्त्व आहे. कारण आपल्यासाठी वर्षभर शेतात काबडकष्ट करून घाम गाळणार्‍या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाची तयारी महिनाभर आधीच सुरू होते.
संपूर्ण गावात आपले बैल उठून दिसावेत यासाठी शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी केली जाते. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शासकीय ध्येय धोरणांच्या अदूरदर्शीपणामुळे शेतकर्‍यांच्या संकटात अधिकच भर पडली. त्याचा परिणाम बैलोत्सवाच्या अर्थात पोळ्याच्या सणावरही झालेला दिसून आला.
शहर परिसरात पारंपारिक शेतीचा व्यवसाय दिवसेंदिवस लुप्त होत असला तरी पंचक्रोशीतील ग्रामीण भागात आजही पोळ्याचे महत्त्व अबाधित असल्याचे दिसून येते. नवीन नाशिकचा परिसर हा विल्होळी, पाथर्डी, पिंपळगाव खांब, सारुळ, वाडिवर्‍हे, दाढेगाव, मोरवाडी, कामठवाडा, राजूर बहुला या ग्रामीण भाग व नाशिक शहराला जोडणारा मध्यवर्ती परिसर आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण संस्कृतीचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न नवीन नाशिकमध्ये दिसून येतो. पोळ्यासारख्या सणांच्यावेळी हे महत्त्व अधोरेखित होताना दिसते.
ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग पोळ्याच्या पूर्वतयारीच्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकर्‍यांनी आपापल्या बैलांसाठी गोंडे, शेंब्या, घांगरमाळ, मोतीसर, बाशिंगे, झूल, घाटी, घोंगर, पैंजण, रेबिन, चाळ, कासरा, मोरखी, पितळी साखळी, वेसन, कवडी माळ, तिरंगी माळा, घुंगरु पट्टे, माथोरी, चवर, बेगड, तोडे अशा साहित्याची खरेदी केली. शनिवारी या खरेदीला अधिकच उधाण येणार असल्याने या साहित्य विक्रीची बाजारपेठही सजून सज्ज झाली आहे.
मात्र आगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍याला बैल सजावटींच्या वस्तुच्या वाढलेल्या भावांचा फटका सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
मात्र परिस्थिती कशीही असली तरी बैलपोळा साजरा करण्याची मानसिकता असल्याने शेतकरी उद्या साजर्‍या होणार्‍या पोळ्याच्या जय्यत तयारीला लागला आहे यात शंका नाही.

LEAVE A REPLY

*