सारदे ग्रामस्थांची पूरणपोळीची ३५ वर्षांची परंपरा

0

नवीन नाशिक | वार्ताहर महाराष्ट्राचे अराध्य दैवत पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई येत्या २३ तारखेला एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक वार्‍या वारकर्‍यांसमवेत पंढरपुरात मजल दरमजल करत पोहोचत असतात. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय.

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक, सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.

संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान-मोठा हा भेद नाही. नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे वारी होय.

जो नियमित वारी करतो तो वारकरी. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील, शहरातील लोक दिंड्या काढून वारीमध्ये सहभागी होतात. डोक्यावर तुळशी, हातात टाळ-मृदुंग, तोंडातून पंढरी, ज्ञानोबारायांचा जयघोष करीत हे वारकरी ठिकठिकाणचा मुक्काम करीत विठ्ठलाच्या दर्शनाने भारावून जातात.

कैवल्य साम्राज्य चक्रवती संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यास ४७ दिंड्या नोंदणीकृत आहेत. त्यात वैकुंठवासी गुरूवर्य ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे यांनी सुरू केलेली दिंडी माऊलीच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठी दिंडी म्हणून प्रचलित आहे.

५ ते ६ हजार वारकरी या दिंडीत सहभागी असतात. गेल्या काही दशकांपासून ही दिंडी नियोजन व शिस्तबद्धपद्धतीने सुरू आहे. ही दिंडी द्वादशीला पुणे येथे मुक्कामी असते. दरवर्षी नियोजनाप्रमाणे द्वादशीला दुपारचे जेवण पूरणपोळी (मांडे) व आमरस असते.

या ५ हजार वारकर्‍यांना खापराचे मांडे कसे बनत असतील हे नवलच आहे. हे शक्य केले आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सारदे गावातील ग्रामस्थांनी. दरवर्षी समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ सारदे यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातील महिला यात सहभागी होऊन आपापल्या घरातून पूरणपोळी बनवून गावातील राम मंदिरात जमा करतात व द्वादशीला सासवड येथे दुपारपर्यंत पोहोचवून संपूर्ण दिंडीला मांडे भोजनाचे जेवण स्वत: वाढून कार्य सिद्धीस नेतात.

हे कार्य गावाने ३० ते ३५ वर्षांपासून अविरतपणे चालू ठेवले आहे. सारदे गावातील ग्रामस्थांच्या भावना वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या असून वारीतूनच विठोबा-रखुमाईची भेट जणूकाही आपल्याला होत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

वारकरीसाठी अनेक लोक आपल्या अंगणामधून अनेक प्रकारे पुण्य साधण्यासाठी जेवणाची, राहण्याची सोय करून त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देत असतात. वर्षातून एकदा आपल्याल असा योग लाभत असल्याने अनेक गावकरी सुद्धा गावात वारकर्‍यांच्या सेवेसाठी आतुरतेने वाट पाहात असतात.

वारकर्‍यांच्या रुपाने विठोबाची भेट होत असल्याची भावना व उत्कंठा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. वारकर्‍यांबरोबरच पंढरपूरला जाण्याची ओढ त्यांना लागलेली असते. ज्यांना वारकर्‍यांसोबत जाणे शक्य नसते ते भक्तीभावाने आपापल्या परीने सेवा करून त्याचा लाभ घेत असतात.

 

LEAVE A REPLY

*