होमगार्ड्सची ‘पोलीस’ सेवा बंद; निधीची उपलब्धता नसल्याने गृहविभागाचे आदेश

होमगार्ड्सची ‘पोलीस’ सेवा बंद; निधीची उपलब्धता नसल्याने गृहविभागाचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वीच पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी, वाहतूक आणि सुरक्षा या दोन घटकांसाठी कायम नियुक्त करण्यात आलेल्या राज्यभरातील हजारो होमगाडर्सचे काम थांबवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील ८०० हून अधिक होमगार्ड्सला फटका बसला आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचार्‍यांचे बळ अपुरे पडत असल्याने होमगार्ड्स कायम नियुक्त देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. विशेष म्हणजे या होमगार्ड्सना कायमस्वरूपी काम मिळेल याची तजवीज करण्यात आली होती. पोलिस महासंचालकांच्या प्रस्तावास जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यामुळे राज्यासह नाशिकमधील ८०० होमगार्डस्ला रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र या निर्णयास सहा महिने उलटत नाही तोच गृह विभागाने निधीचे कारण पुढे करीत मागील आठवड्यापासून होमगार्ड्सला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांची संख्या कमी असल्याने गस्त, प्रतिबंधक कारवाई आदी महत्त्वाच्या कामांवर परिणाम होत असल्याने होमगार्डच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक होमगार्डस्ला हक्काचे काम मिळेल या हेतून प्रत्येकी सहा महिन्यासाठी नियुक्ती देण्यात आली होती. शहरात बाराशे होमगार्डनियमित उपलब्ध असतात. पोलीसांच्या मागणीनुसार संबधितांंचा वापर सण उत्सव आणि निवडणूक काळा पुरताच केला जातो. त्यामुळे अर्धवेळ काम करून होमगार्ड आपला उदर्निवाह करीत असतांना काही महिन्यांपूर्वी गृह विभागाने कायम रोजगार देण्याचा निर्णय घेतला होता.

शहरासह ग्रामीण पोलीसांनाही होमगार्डची मदत मिळाल्याने गुन्हेगारी रोखण्यात यश आले होते. काही महिन्यांपूर्वी शहरातील एटीएम लुटीच्या घटनांमध्ये होमगार्डसने धाडस दाखविल्याने आरोपी जेरबंद करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालय, बाल व सुधारगृहांमध्ये होमगार्डची नियुक्ती करण्यात आल्याने पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता भरून निघाली होती. तर वाहतूक शाखेच्या दिमतीला मोठ्या संख्येने होमगार्ड नियुक्त करण्यात आल्याने शहरातील वाहतुकीस शिस्त लागल्याचे चित्र होते. असे असतांनाच शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने होमगार्डसवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली असून त्यांना आता पूर्वी प्रमाणेच मिळेल ते काम करावे लागणार आहे.

होमगार्ड पुन्हा देण्याची विनंती
काही महिन्यांपासून पोलीस मदतीसाठी देण्यात आलेल्या होमगार्डस्ची पोलीस प्रशासनाला मोलाची मदत झाली आहे. निधीची उपलब्धता नसल्याने त्यांची सेवा थांबवण्याचे महासंचालकांचे आदेश मिळाले आहेत. परंतु निधीची तरतूद होताच पुन्हा होमगार्ड पोलीस मदतीसाठी मिळावेत, अशी विनंती सर्वच जिल्ह्याच्या पोलिसांनी महासंचालकांना केली आहे. पुढे असा निर्णय होऊ शकतो.
– शर्मिष्ठा वालावलकर, प्रभारी जिल्हा समादेशक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com