रस्त्यांची कामे दर्जेदार न झाल्यास कारवाई- खा. डॉ. भारती पवार

jalgaon-digital
4 Min Read

जानोरी । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत जोपुळ- खडक सुकेना -मोहाडी या रस्त्यांची कामे सुरू असून, ती निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामेही निकृष्ट आढळत असल्याची तक्रार केली होती. याप्रश्नाची दखल घेत ‘देशदूत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी दखल घेतली. रस्तेप्रश्नी अधिकार्‍यांची बैठक बोलावून कामे उत्तम दर्जाची व्हावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून जोपुळ- खडकसुकेणा -मोहाडी हा रस्ता दुरुस्त व्हावा, यासाठी नागरिक वेळोवेळी मागणी करीत होते, परंतु पाहिजे तितका निधी या रस्त्याला प्राप्त होत नसल्याने रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. वारंवार केलेली मागणी लक्षात घेता हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. साधारणत: साडे सहा किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून रस्ता दर्जेदार व्हावा, अशी अपेक्षा असताना रस्ता पाहिजे त्या दर्जेदार स्वरूपाचा होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासन कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी उपलब्ध करून देते, परंतु काही ठेकेदार संगणमत करुन रस्त्यांचा दर्जा खालावतात. त्यातूनच रस्त्याचे काम पूर्ण होताच काही दिवसांत पुन्हा त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर लगेच नागरिकांची ओरड सुरू झाल्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो, तेही रस्त्याच्या लेवल नुसार खड्डे भरले जात नाहीत. खड्डा भरल्यावर मध्येच उंचवटे तयार होतात. त्यामुळे अपघातांचे संख्या आणखी वाढली जाते. त्यामुळे पूर्वीचे खड्डे होते तर किमान खड्डे बघून वाहनांचा वेग तरी कमी होत होता, परंतु आता वेगात जाणारी वाहने उंचवट्यावर उडून दिशा बदलत अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रस्त्याचे खड्डे भरल्याचा प्रकार हा, असून अडचण आणि नसून खोळंबा अशी होताना ग्रामीण भागात दिसत आहे.रस्त्यांचे कामे चांगल्या दर्जाचे झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित विभागाचे अधिकार्‍यांनी रस्ता कामाची व्यवस्थित चौकशी करून तो चांगल्या प्रतीचा होतो की नाही, याबाबत स्वतः पडताळणी करणे आवश्यक आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. परिणामी संबंधित विभागाचे अधिकारी निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांना पाठीशी घालतात. त्यांच्यावर कारवाई करून रस्ता पूर्णतः दर्जेदार स्वरूपाचा व्हावा, यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच त्यात नागरिकांना समाधान लाभेल.

दरम्यान, ‘देशदूत’ने याप्रश्नी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच खा. डॉ. पवार यांनी आढावा बैठक घेतली. निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांना पाठिशी न घालता त्यांच्यावर कारवाई करून दर्जेदार काम करून घ्यावे, असे आदेश दिल्याने संबंधितांचे धाबे दणाणल्याची चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून सूर्य असलेले कामे हे दर्जेदार स्वरूपाचेच व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यानुसार आम्ही स्वतः पडताळणी करतो. त्याचप्रकारे यासाठी स्पेशल विभागही कामाच्या दर्जाची तपासणी पडताळणी करते त्यामुळे काम हे उत्तम दर्जाचे होईल यात शंका नाही. ३.७५ मिटर या रस्त्याची रुंदी असून रूंदी वाढवतांना दोन्ही बाजूला एक एक फुटाचा रस्ता रुंद करायचा असून तसे काम चालू आहे. स्थानिक ग्रामस्थांना ते कमी वाटत आहे परंतु अंदाज पत्रकानुसार जेवढी रूंदी असेल एवढावढा रस्ता सुरू करण्यात येईल. तसेच या रस्त्याची पाच वर्षाची आम्हीदेखील संबंधित ठेकेदाराकडून घेतले जाणार असल्याने रस्ता हा दर्जेदारच होईल. काही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आली आहे ते बुजवली असतांना रस्त्याची लेवल नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत संबंधित ठेकेदारांना तसे रस्त्याच्या लेवल नुसार खड्डे बुजवण्याचे आदेश दिले असून तात्काळ त्यात सुधारणा करण्यात येईल.
ए.व्ही.आव्हाड, कार्यकारी उपअभियंता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *