नाशिक | संघर्षातून समृद्धीचा प्रवास – विवेक मिशाळ (मार्केटिंग अँण्ड फायनान्स)

5

गेल्या काही वर्षांत नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील मध्यस्थ, सद्सद्विवेक ठेवून काम करणारा मालमत्ता ग्राहकांचे स्वप्न चांगल्यारितीने पूर्ण करणारा असू शकतो हे गोविंद रिअल इस्टेट एजन्सीचे विवेक मिशाळ यांची कामाची पद्धत पाहून पटते.

क्षमतावाढीसाठी नेहमीच प्रयत्न करा, यश मिळेल.

मी गेली १४ वर्षे रिअल इस्टेटच्या क्षेत्रात काम करतोय. मध्यस्थ प्रगल्भ असेल तर डिलवर बोजा नसतो. त्याउलट मध्यस्थ अप्रगल्भ किंवा वाम मार्गाने पैशाच्या मागे लागणारे असतील तर मालमत्तेतील वाद निर्माण होतात आणि ते शिगेला पोहोचून न्यायव्यवस्थेवरही ताण पडतो. संघर्षातून समृद्धी हा मार्ग अवलंबला तर मंदी जाणवतच नाही.


माझे वडील नाशिकमध्ये सरकारी अधिकारी होते. एचपीटी महाविद्यालयातून पोलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. टॉपर होतो. आयएएसच्या परीक्षेसाठी चार वर्षांत भरपूर वाचन आणि अभ्यास केला. महाविद्यालयात नोकरी करायला सुरुवात केली; पण नेट, सेट झाले नसल्याने नोकरी सोडली.

व्यवसायाची आवड सहावीपासून होती. तेव्हापासून छोटे छोटे व्यवसाय करत गेलो. तो अनुभव होताच. त्यानंतर जगन्नाथ हॉटेल सुरू केले. तेव्हा वडिलांनी सांगितले, ‘त्यात गुंतण्यापेक्षा तू इस्टेट ब्रोकर हो.’ त्यावेळी मी विचारपूर्वक हा व्यवसाय निवडला. कारण ब्रोकरची प्रतिमा समाजात फार स्वच्छ नव्हती. काही ब्रोकरनी निराशावादी चित्र उभे केले. पहिले क्लायंट होती माझी मावशी. तिला नाशिकमध्ये फ्लॅट मिळवून दिला आणि तिने माझे सेवामूल्य दिले.

मी महाविद्यालयात असताना इस्कॉनचे लोक तिथे येत. त्यांच्यामुळे आमूलाग्र बदललो. प्रत्येकाला संघर्ष अटळ असतो. त्यामुळे अस्वस्थता, असुरक्षितता यामध्ये राहण्यापेक्षा आपल्यात सकारात्मक सुधारणा कराव्यात. त्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी डिल करताना असे जाणवले की, लोकांना मध्यस्थ म्हणून पैसे देण्यात काहीच अडचण नाहीये. त्यांना हवीय चांगली सेवा. चांगल्या व पारदर्शी सेवेमुळे माझी माऊथ पब्लिसिटी होत गेली. त्या माध्यमातून सेवेचे मोल कळलेले ग्राहक आणखी लोकांना माझ्याकडे पाठवू लागले.

परदेशातल्या लोकांच्या घरांची खरेदी-विक्रीही करू लागलो. एका अनिवासी भारतीयाचा नाशिकमधील बंगला विकायचा होता. त्यांची अपेक्षा ४० लाख रुपये होती, तर त्याची वास्तवात किंमत ७५ लाख रुपये होती. खोटे गणित सांगून मार्जिन मारण्यासाठी मी काहीही करू शकलो असतो. पण मी ती जागा ७३ लाखांना विकली आणि ती व्यक्ती माझ्या सच्चेपणाला परदेशात घेऊन गेली.

त्यानंतर मला अनिवासी भारतीय क्लायंटही मिळत गेले. एका एनआरआय ग्राहकाला त्याच्या मालमत्तेचे सुंदर फायलिंग करून दिले. त्यांना विचारले, दहापैकी किती गुण देणार? ते म्हणाले, ९.७ देईन. याचे कारण त्यांनी सांगितले, परदेशात जाताना त्यांना या मालमत्तेचे बाड घेऊन जाणे अवघड होईल. त्यापेक्षा ते स्कॅन करून एका सीडीमध्ये दिले तर? मी वेळेत ते काम करून दिले. या सीडीवर माझे ब्रॅण्डिंग करण्याकरता एक लोगोही केला. तंत्रज्ञानातील सुधारणेप्रमाणे बदलत गेलो.
छोट्या सदनिकेपासून मोठ्या मालत्तेपर्यंतची डिल करताना ठरवले की एका व्यक्तीचे एकच डिल करायचे.

तत्त्वज्ञान आणि व्यवसायाची सांगड घातल्याने कामाचा व्याप वाढला. विश्‍वासार्हता वाढली. माझे सामाजिक चारित्र्य मला अधिक मोलाचे वाटते. आध्यात्मिक व्यासपीठ असल्याने हे शक्य होतेय. ग्राहकांच्या सर्व अपेक्षांच्या पूर्तता करण्यासाठी कर्ज प्रक्रियेपासून सातबारावर त्याच्या नोंदी होईपर्यंत सगळ्यात बारकाईने लक्ष घालतो. विक्री करणार्‍या व्यक्तीला पूर्ण फाईल दाखवायला सांगतो. ती निर्दोष असेल तरच पुढे जातो.

गृहकर्जासाठी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांशी ग्राहकांची गाठ घालून देतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर घरपट्टी, ऍग्रिमेंट, सातबारा, पाणीपट्टी, सिटी सर्व्हे उतारा एकाच दिवशी ग्राहकाला मिळवून देतो. बाहेरगावच्या ग्राहकाला घर भाड्याने मिळवून देतानाही त्याला गॅस ट्रान्सफर, शाळा प्रवेश करण्यापासून शिफ्टिंगसाठी ज्या सेवा देता येतील त्या देतो. संवाद उत्तम आणि स्वच्छ कारभार असल्याने मला या व्यवसायात अजिबात मंदी जाणवत नाही.

मालमत्तेची ऑनलाईन खरेदी-विक्री करणारी अँप्स आली तेव्हा अनेक ब्रोकर्सना ती आपल्या पोटावर पाय देणारी वाटली होती. त्यात ग्राहक आणि विक्रेता असा थेट संवाद असतो. अनेकदा ग्राहकांना आणि विक्रेत्यांना खरेदी-विक्रीतील अनेक तांत्रिक गोष्टी माहीत नसतात. तेव्हा मध्यस्थाची गरज लागते.

मध्यस्थ एखाद्या मालमत्तेच्या ‘ग्राऊंड रिलिटी’पर्यंत पोहोचतो, जी ऑनलाईनच्या आभासी जगात कळत नाही. त्यामुळे या ऍपचाही सकारात्मक वापर करायला सुरुवात केली. वर्षाला मी २० ते २५ मालमत्तांची खरेदी-विक्री तर ५० ते ६० मालमत्तांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार करून देतो. यात सदनिका, वित्तीय संस्था, बंगले, एटीएम, दुकाने या सर्वांचा समावेश आहे. आधार कार्डमुळेही व्यवहारात बराच फायदा झाला आहे.

गेल्या ६ ते ८ महिन्यांत या क्षेत्रात मंदी जाणवायला लागल्यावर व्यवसाय सोडून दिलेले काही ब्रोकर मला भेटले. ते महिना दहा-पंधरा हजार पगारावर कुठेतरी नोकरी शोधत होते. मी त्यांना विचारले, ‘कामाचे पैसे मिळाल्यावर पार्टी केली का?’ ते हो म्हणाले. पैसे चंगळवादासाठी उडाले होते; पण व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी फार कुणी प्रयत्न केले नाहीत. या विषयावर अशोका प्रशिक्षण संस्थेत आतापर्यंत ४ हजार ब्रोकर्सना व्याख्यान दिले.

माणुसकीने काम केल्याने परगावच्या लोकांसमोर नाशिकची प्रतिमा वधारण्यास मदतच होते. मी नॅशनल रिअल इस्टेट रिल्टर्सचा सदस्य आहे. आमचे नेटवर्किंग उत्तम आहे. मी गितेवर व्याख्याने देतो. गायक आहे. मुलगा उत्तम तबला वाजवतो. पत्नी प्राध्यापिका आहे. घरी टीव्हीही नाही. वादन, गायन, हसतखेळत गप्पा यात रस असल्याने माझे कुटुंबही समाधानी आहे. त्याचे पडसाद माझ्या व्यवसायात उमटतात.

(शब्दांकनः शिल्पा दातार-जोशी )

 

( पुढील मुलाखत : योगिता जगधाने )

 

5 प्रतिक्रिया

  1. Wow! That’s so inspiring. Selecting a profession where you have to start from zero, having genuine concern for everyone, honesty and maintaining spiritual base at the same time is an inspiration for everyone.

LEAVE A REPLY

*