कर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात ‘तेजस’चा तुरा!

‘देशदूत तेजस पुरस्कार’ सोहळा अपूर्व उत्साहात

0
नाशिक |विशेष प्रतिनिधी  स्वत:च्या कार्यकर्तृत्वाला अंगभूत कौशल्याची जोड देत जीवनशैली समृद्ध करणार्‍या आणि त्या माध्यमातून समाजाला योगदान देणार्‍या तरुणाईचा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा ‘देशदूत’चा हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने नोंदवलेली उपस्थिती त्याचे वेगळे वैशिष्ट्य राहिले.

कर्तृत्ववान तरुणाईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ गेले अनेक दिवस नाशिक जिल्हावासियांच्या उत्कंठतेचा भाग बनून राहिला होता. याअंतर्गत अकरा विविध श्रेणीमधील प्रत्येकी चार आणि वाचक श्रेणीमध्ये दोघांना नामांकने देण्यात आली होती.

परीक्षकांच्या चमूने परीक्षणांती श्रेणीनिहाय पुरस्कारार्थींवर शिक्कामोर्तब केले. शनिवारी रावसाहेब थोरात सभागृहात तीन तास रंगलेल्या सोहळ्यात पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सारस्वत बँकेचे संचालक हेमंत राठी, ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा व जनक सारडा, लिनीचे संचालक विष्णूशेठ भागवत, भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्सचे संचालक निवृत्ती भदाणे आदी उपस्थित होते.

सदर उपक्रमास सारस्वत बँकेने मुख्य प्रायोजकत्व दिले, तर लिनी (प्रायोजक), भदाणेज हायटेक कॉम्प्युटर्स (सहप्रायोजक)े, दिल्ली पब्लिक स्कूल (नॉलेज पार्टनर) आणि श्री ऍडव्हर्टायझिंग (आऊटडोअर पार्टनर) यांचेही सहकार्य लाभले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात ‘देशदूत’चे संचालक जनक सारडा यांनी समाज प्रबोधनासोबत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने ‘देशदूत’ने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने गुणवंतांना गौरवण्याच्या परंपरेचा उल्लेख केला.

ज्ञानवंत गुणवंत सन्मान, कर्मयोगिनी, येवला दर्पण आणि आताचा ‘तेजस’ पुरस्कार ‘देशदूत’ परंपरेला समृद्धीची किनार बहाल करणारे प्रयोग असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी ‘देशदूत’च्या वतीने सर्व अतिथी तसेच उपक्रमास सहकार्य करणार्‍या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

गौरी औरंगाबादकर यांनी गणेशवंदना सादर केली, तर दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन परी ठोसर यांनी केले. ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांनी आभार मानले.

या सोहळ्याला जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांच्यासह जिल्ह्यातील ‘देशदूत’ वाचक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जल्लोष अन् भारवलेले वातावरण
तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारा ‘देशदूत तेजस पुरस्कार’ सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी नाशिककरांनी रावसाहेब थोरात सभागृहात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकांना जागेअभावी सभागृहात उभे राहावे लागले.

सभागृहात जागा नसल्याने नाशिककर सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत उभे होते. तरुणाईचा तेजस पुरस्कार असल्याने नाशिककरांनी सभागृहात जल्लोष केला. कला व संस्कृती, शेती, समाजकारण, क्रीडा, राजकारण आदी क्षेत्रातील पुरस्कार जाहीर होताच नाशिककर जल्लोष करत होते.

विशेष राजकारण क्षेत्रातील उदय सांगळे, नयना गावित, यतीन कदम यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांच्या आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराने टाळ्या व शिट्या वाजवत जल्लोष केला. विविध क्षेत्रातील नाशिककर उपस्थित असल्याने सभागृहात भारवलेले वातावरण होते.

हे ठरले पुरस्कारार्थी..
प्राजक्त देशमुख (कला व संस्कृती), गोकुळ जाधव (कृषी), उदय सांगळे (राजकारण), प्रमोद गायकवाड (समाजकारण), प्रसाद खैरनार (क्रीडा), सचिन जोशी (शिक्षण), सोहम गरूड (स्टार्ट-अप्स), पंकज घाडगे (मार्केटिंग व फायनान्स), पवन कदम (तंत्रज्ञान), डॉ. राजन पाटील (वैद्यकीय), ऍड. सुवर्णा पालवे-घुगे (विधी) आणि सचिन गडाख (वाचक) आदींचा समावेश आहे.

या मान्यवरांनी केले परीक्षण
विनोद शहा, सुरेखा बोराडे, अपूर्वा जाखडी, राजेश गडाख, ऍड. समीर जोशी, कैलास क्षत्रिय, संजय क्षीरसागर.

भारावलेले अन् भावनाप्रधान                                                                             या पुरस्कार सोहळ्यात अनेक सुप्त गुणवंतांचे कार्य सर्वांसमोर आले. ‘देशदूत तेजस पुरस्कारा’च्या रूपाने मिळालेल्या शाबासकीच्या थापेमुळे पुरस्कारार्थी भारावून गेले होते. अनेकांना तर आनंदाश्रू अनावर झाले.

यावेळी खेळाडू प्रसाद खैरनार याने आपली आई कर्करोगाशी झुंज देत असताना तिने ‘देशदूत’च्या पुरस्कारासाठी जाण्याचा आग्रह केला. हा पुरस्कार तिला समर्पित करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर पंकज घाडगे याने आपली आई अस्तित्वात नाही, परंतु तिची स्वप्ने पूर्ण करायची असून ‘देशदूत तेजस पुरस्कार’ याची सुरुवात असल्याची भावना व्यक्त केली.

‘आयर्न मॅन’ डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचा सन्मान
फ्रान्स येथे झालेल्या जागतिक पातळीवरील खडतर स्पर्धेत विक्रम नोंदवत ‘आयर्न मॅन’ किताब पटकवणारे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘देशदूत’चे संचालक विक्रम सारडा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी डॉ. सिंगल म्हणाले, ‘देशदूत’च्या तेजस पुरस्कार सोहळ्याने जिल्ह्यातील खरे हिरे शोधून काढले आहेत. त्यांनी नाशिकसाठी, देशाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले ते अभिमानास्पद आहे. आपण आपले शहर, जिल्हा प्रगतिपथावर नेण्याचे ठरवले तर ते सहज करू शकतो. मी एक छोटासा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी ठरलो.

माझ्या करिअरची सुरुवात नाशिक येथून झाली. १९९७ पासून माझा ‘देशदूत’ परिवाराशी संबंध आहे. अतिशय निष्ठेने ‘देशदूत’ छुप्या हिर्‍यांना सर्वसामान्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आला आहे. हा उपक्रम असाच सुरू राहून खरे हिरे समाजासमोर येत राहावेत, अशी अपेक्षा डॉ. सिंगल यांनी व्यक्त केली.

स्वप्नील, अमृताच्या गीतांवर थिरकली तरुणाई
‘राधा ही बावरी’, ‘का कळेना कोणत्या क्षणी’, ‘मला वेड लागले प्रेमाचे’, ‘आज मै उपर आसमा निचे’, ‘ही पोरी साजूक तुपातली..,’ ‘पिंगा ग पोरी पिंगा’ अशा गायक स्वप्नील बांदोडकर व अमृता दहिवलकर यांनी सादर केलेल्या गीतांवर उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरला.

टाळ्या, शिट्या अन् वन्स मोअरने सभागृह दणाणून गेले होते. स्वप्नीलने पुणे-मुंबई-पुणे या चित्रपट गीतादरम्यान आवाहन केल्यानुसार प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू करून हातात हलवत ठेवल्या. यावेळी सर्व सभागृहात काजवे अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, मधल्या वेळेत स्वप्नील बांदोडकरची मुलाखत सूत्रसंचालिका परी ठोसर यांनी रंगवली.

LEAVE A REPLY

*