नाशिक | सचिन गडाख (वाचक श्रेणी) , सुबक अक्षरे गिरवीन…

1
उभी रेष, आडवी रेष आणि शून्य म्हणजे सुलेखन, असे प्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख सांगतात. मराठी मायभाषेतली अक्षरे हे त्यांचे कार्यक्षेत्र कधी झाले ते त्यांनाच समजले नाही. चाकोरीपलीकडच्या व्यवसायातून, कलेतून प्रामाणिकपणा टिकवून ठेवत नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळू शकते, हे गडाख यांची वाटचाल पाहून लक्षात येते. त्यांच्या मते, सुलेखन संकल्पना अंतःकरणातून निघते, मग कागदावर उतरते.
असेन मी, नसेन मी,
माझ्या अक्षरातून दिसेन मी’ 
माझ्या सुलेखन कलेमुळे जगभरात ओळखला जातोय. हे वेगळे क्षेत्र मनी-ध्यानी नसताना लहान वयातच माझ्या आयुष्याचा एक भाग झाले आणि तेच माझे करिअर कधी झाले ते कळलेही नाही. व्यवसायाबरोबरच सुलेखन ही संज्ञा माहीत नसणार्‍यांनाही मी त्याची ओळख करून दिली, अजूनही देतो आहे.

लहानपण नाशिकला गेले. शाळेत गणित आवडता विषय होता. गणितात मी सर्वात जास्त गुण मिळवायचो. बॅडमिंटन, फुटबॉल खेळांचीही खूप आवड होती. पेन, कागद, रंग मिळाले की रेखाटणे सुरू व्हायचे.

 वडील रिक्षाचालक होते. आमचे लेखन सुबक असावे, स्वच्छ आणि सुंदर अक्षर असावे याकडे वडिलांचा कटाक्ष असायचा. स्वच्छ आणि सुंदर अक्षर म्हणजे सुलेखन. शाळेत सुंदर हस्ताक्षरामुळे मलाच फळ्यावर दिनविशेष, सूचना, सुविचार लिहायला शिक्षक सांगत असत.
बारा-तेराव्या वर्षीच स्क्रीन प्रिंटिंग शिकलो. महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असतानाच १९९८ साली प्रिंटिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००२ साली स्वतःचे प्रिंटिंग युनिट सुरू केले.
व्हिजिटिंग कार्डस्ची खूप कामे मिळायला लागली. वडिलांची रिक्षा जिथे असायची तिथल्या लोकांनी मला खूप साथ दिली. माझ्या धडपडीबद्दल त्यांना छान वाटायचे. ओळखीतून कामे मिळत आणि वाढतही गेली. मला खरे तर भारतीय सैन्यदलासाठी काम करायचे होते; पण माझे क्षेत्र आपसूकच ‘सुबक अक्षरां’कडे वळले.
त्यावेळी कृष्णधवल संगणक नुकतेच बाजारात येऊ लागले होते. मलाही संगणक वापराचे ज्ञान नव्हते. पण त्याचे रितसर शिक्षण न घेता इतरांचे पाहून संगणकावर काम करायला शिकलो. टाकाऊ असलेल्या कागद, केस, कुंचा, खराटा या वस्तूंपासून मी सुलेखन करून पाहिले.
तो स्ट्रोक वेगळा मिळाला. कॅलिग्राफी किंवा सुलेखन करताना संगणकाचे माध्यम अधिक सुलभ ठरते, हे तेव्हा लक्षात आले. त्याआधी अक्षरे पानावर काढून, स्कॅन करून, ट्रेस करून वापरू लागलो. इतर फॉंट वाढू लागले तशी आकर्षक कामांची संख्याही वाढू लागली.
संगणकीय कामासाठी माऊसवर काम करण्याचा दोन वर्षे सराव केला. वेळ वाचू लागला. नाशिकमधील प्रिंटर्सनी प्रोत्साहन दिले. घरांवरची अक्षरे आकर्षक पद्धतीने तयार करू लागलो. मराठी भाषेतली ही सुबक अक्षरे पाहून माझ्याकडे आलेल्या सत्तर टक्के दुकानदारांनी दुकानांवरील नावाच्या पाट्यांसाठी मराठी भाषेचा वापर केला, ही माझ्या मायबोलीसाठी खूपच छान गोष्ट घडली.
फेसबुकवर सक्रिय असल्याने माझे सुलेखन जगभरात पोहोचले. प्रसार माध्यमांनी मदत केली. २०१५ मध्ये ‘झी महाराष्ट्र, नव्या युगाची स्मार्ट सुरुवात’ या कंपनीचा सभासद होण्याची संधी मिळाली. फ्लेक्स, लेझर, प्रिंटिंग, डिझायनर्स यांच्यासाठी रजिस्ट्रेशन करून घेतले.
जवळपास ७५ ते ८० प्रिंटर्सना मी मोफत सुलेखन शिकवले. लोकांना तसेच महापालिकेच्या शाळेतील मुलांना सुलेखनाचे मोफत प्रशिक्षण देतोय. माझे शाळांना सांगणे आहे की, अभ्यासक्रमातला अर्धा तास तरी मुलांना सुलेखनासाठी द्यावा.
नाशिकबरोबरच पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अकोल्यापासून देशभरात माझ्या कामाचे नेटवर्क तयार केलेय. त्यामध्ये ९० टक्के प्रिंटर्स तर १० टक्के डिझायनर्स आहेत. आज महिनाभरात दीडशे ते दोनशे नावे तयार करतो.
अनेक मालिका, चित्रपटांच्या शीर्षकांची अक्षरे सुबक करण्यातही माझा हातभार लागलाय. सुलेखनकार फक्त अक्षरे गिरवत नाही तर ती एक कला आहे. ‘शिस्तीत केलेला बेशिस्तपणा’ म्हणजे सुलेखन किंवा कॅलिग्राफी. आधी ती अंतःकरणातून निघते, मग कागदावर उतरते.
सुलेखनावेळी तुमच्या मनात निराशेचे सूर असतील तर तेच अक्षरांद्वारे उमटतात. उभी रेष चांगली काढणारा आयुष्यात सरळ उभा राहू शकतो. आडवी रेष चांगली काढणारा शांत झोपू शकतो आणि वर्तुळ जाणणारा विश्‍व जाणू शकतो, ही कॅलिग्राफीची साधी सोपी ओळख.
आता हे क्षेत्र तरुणाईला आवडतेय. कला वाटल्याने कमी होत नाही, हा माझा विश्‍वास आहे. प्रत्येकाचा विचार आणि क्षमता वेगळी असते. अनेक लोकांनी मला माझ्या कॅलिग्राफीचा फॉंट तयार करण्याची विनंती केली आहे.
पण ही गोष्ट तयार स्वरुपात मिळाली तर धडपड करून वेगळी ओळख निर्माण करणारे कलाकारच मिळणार नाहीत. आज माझ्याकडे सर्व काही आहे, ते सुलेखनामुळेच. आई-वडिलांनी नेहमीच माझ्या धडपडीला पाठिंबा दिला.
भविष्यकाळात मला व्हीएफएक्स, ऍनिमेशन शिकायचीही इच्छा आहे. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यातही नवीन प्रयोग करून दाखवण्याचा मानस आहे.
( शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी )

1 COMMENT

LEAVE A REPLY

*